Friday, 30 April 2021

सुमन कामठे ..... सासू आणि आज्जी

सुमन कामठे ..... सासू आणि आज्जी 

साधारण २०१४ मधली गोष्ट मला तारीख नाही आठवत पण पितृपक्ष संपल्यानंतरचे दिवस. आणि तेंव्हा अगदीच माझ्या लग्नाची थोडी चक्कर चालू होती म्हणायला काही हरकत नाही. आमच प्रेमप्रकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरु झाले होत. आणि लग्नाची काहीही बोलणी नाही करायची म्हणून आम्हाला एकमेकांना समजून घेण्यासाठीच पितृ पंधरवडा होता. बर या बोलण्यानंतर मला एक एक दिवस असे आईला, मग आज्जीला मग मामांना भेटायचे असे साधारण शेड्यूल होते. म्हणजे या सर्वांनी मान्यता दिली तर लग्न होऊ शकते असे काहीसे होते. आईला सदाशिव पेठेतल्या सीसीडी मध्ये भेटणे झाले. सुरवातीला एका शाळेतल्या शिक्षिकेला तिच्या मुलीच्या लग्नाबद्दल विचारणे आणि भेटायचे म्हणजे जरा अवघड होते. शिक्षिका म्हणजे हातात छडी घेणाऱ्या, विद्यार्थ्यांना ओरडणाऱ्या असा सर्व समज मी शिक्षक आणि प्राचार्य असून सुद्धा आहे तसाच होता. तरीही मी पहिल्या अग्नी परीक्षेला सामोरे जायचे म्हणून भेटलो. आणि काय परीक्षा पास. 

पण पुढचा टास्क थोडा अवघड होता तो म्हणजे आजी सासू आणि मामांना भेटायचे. त्यात मी नव्वद च्या दशकातले सर्व सिनेमा बघणारा आणि एकता कपूर चा भक्त म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे लग्नाळू तरुणांचे चित्रपट कथानके माझ्या समोर येत होती. हेमा मालिनीचा जमाईराजा चित्रपट मी बघितला होता. त्यामुळे खाष्ट हेमा मालिनी, किंवा तशा म्हणजे अगदीच ललिता पवार सारख्या सासू आणि अनुपम खेर सारखे मामा असे काही तरी माझ्या समोर येणार अशी मला दिवसा ढवळ्या स्वप्न पडू लागली. याला सर्वस्वी जवाबदार स्वप्नाली म्हणजे होऊ घातलेली अर्धांगिनी होती. तिचे म्हणणे होते, "एकवेळ आई शांत आहे पण आज्जी ती जरा कडक आहे. तिला असे सर्व व्यवस्थित लागते." लग्न जमल्यावर मुलींनी हे असे वागणे एकदमच अपेक्षित नसते. हे अगदीच मस्तानी प्यायला देऊन आता तुम्हाला वाघाच्या पिंजऱ्यात जायचे आहे तयार राहा हे सांगण्यासारखे आहे. पण म्हणतात ना लग्नाळू मुले अगदी सर पे कफन बांधून सर्व करण्यासाठी तयार असतात तसा मीही दिल चित्रपटातल्या अमीर खान सारखा तयार झालो. म्हणजे मनामध्ये अगदी सर्व पर्याय अगदी दरवळत होते. ती आज्जी नाही म्हणाली तर काय आळंदी, पळून जाऊन लग्न, आज्जीला पुन्हा नातीने साथ दिली तर आणि लग्नाला नकार कळविला तर पुन्हा मुली शोधून हिच्या नाकावर टिच्चून लग्न करून दाखवावे लागेल अशा भन्नाट कल्पना डोक्यात येत होत्या. 

आज्जीच्या भेटीची तारीख आली. थोड्याश्या भीतीने मनावर ओझे घेऊन भेटायला गेलो. आजीला बघितल्यावर आणखीनच थोडी धडकी भरली कारण साधारण आज्ज्या या काष्टा नेसणाऱ्या अशा समजुतीमधला मी सहावारी साडी, डोळ्यावर चष्मा आणि शुद्ध पुणेरी भाषेतील भाषा बोलणाऱ्या आजीसमोर उभा होतो. काही नाही माझा परिचय झाल्यावर चांगला आहे मुलगा म्हणून आज्जीनी होकार लगेच दिला होता. माझा मनातल्या मनात स्वप्नालीवर पक्का संताप होत होता. म्हणजे हे सर्व असे नॉर्मल होत होते. म्हणजे तो असा 'फिल्मी फॅक्टर' काहीच होत नव्हता. म्हणजे काय याला काय प्रेम विवाह म्हणतात का मी  तर सर्वांनाच पसंत आहे. ज्या अज्जीकडून अपेक्षा धरली होती म्हणजे त्या म्हणतील, 'ये शादी हरगीज हमे मंजूर नही.....' पण त्यांना नात-जावई पहिल्या झटक्यात पसंत पडला. आणि काय अशा या आमच्या लग्नासोबत मला आज्जीसासू असे एक प्रेमाचे नाते भेटले. .... श्रीमती सुमन कामठे. 

या आजी अगदी त्यांच्या नावाप्रमाणे सुमन म्हणजे आपल्या बागेवर प्रेम करणाऱ्या. तिची बाग म्हणजे तिने लावलेल्या माणसांची. घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आदरातिथ्य त्या मनोभावे करीत. मी कधी गेल्यावर त्या हसत हसत समोर येणार, सगळी विचारपूस करणार. स्वत उठून वा वा मस्त, त्यांना नात आणि जावई पाहून वेगळाच आनंद व्हायचा असे मला जाणवायचे. आणि मी जावयांच्या पंक्तीमधला मानाचा आणि मोठा जावई, त्यामुळे माझे लाड तर असे हमखास व्हायचे. संध्या पाणी दे... संध्या चहा नुसता दिला... खारी दे अशा मामीला मी घरी गेल्यावर ऑर्डर असायच्या. नवनाथांचे पारायण करणाऱ्या आजीने शाकाहारी बनून मांसाहाराला राम राम ठोकला होता. गळ्यात माळ वगैरे नव्हती पण मनावर ताबा होता. त्यामुळे व्हेज खाणारा जावई मिळाला यात आजी आणखीन माझ्यावर खुश होत्या. हा पीस काढून खातो मी बिर्याणी पण. 



माझे जावई म्हणून लाड करायला नजर चुकीने जरी राहिले तरी आजी माझ्या सासूबाईंना हे असे करावे लागते तसे करावे लागते असे म्हणून बोलायच्या. आणि काय मी सासू आणि आजी सासू दोघींचा असा लाडका. 

सुमन आज्जीची दुसरी बाग म्हणजे तिने तिच्या घराभोवती फुलविलेली बाग. आजीच्या बागेत नेहमीच गुलाब आणि अबोली फुललेली दिसायची. आम्ही गेल्यावर बागेतल्या झाडाचे शेवगा घेऊन जाण्याचा आग्रह असायचा आजीचा. 

आजी आणखीन एक गोष्टीसाठी प्रसिद्ध होत्या त्या म्हणजे त्यांनी केलेल्या सुंगंधी सुपारीसाठी. जेवण झाले की त्यांची सुपारी बाहेर आलीच पाहिजे. सुरवातीला "मी सुपारी खात नाही मला तसले व्यसनच नाही" असे आज्जींना सांगितल्यावर आज्जींना खुदकन हसायला आले होते. कारण त्यांच्या सुपारीला सुपारी म्हणायचे पण त्यात सुपारी नाही बडीशेप आणि बऱ्याच गोष्टींचा माल मसाला मिळवून सुंगंधी मुखवास असे त्यांनी तयार केले होते. एकदा चटक लागल्यावर नंतर मीच मग पुढच्या फेरीला आज्जी सुपारी असे म्हणायचो. 

म्हातारपणामुळे आजींच्या काही अवयवांनी साथ द्यायला सोडली. मोतीबिंदुंचे ऑपरेशन झाले. कमी दिसू लागले. शरीरात सोडियम ची कमी झाली. पण या सर्वांमध्ये आज्जीचे प्रेम का आमच्यावरचे कमी झाले नाही. आम्ही गेल्यावर आजारी असूनही त्याच उमेदीत त्या आमचे स्वागत करायच्या. शेवटच्या दिवसांत माझ्यासोबत आठवण म्हणून अगदी टिकटॉक देखील आज्जीने बनवले. अखेर २९ एप्रिल २०२० मध्ये आज्जीची प्राणज्योती मावळली. आणि एकाएकी सुमनावली थंडावली. 

आज्जी गेल्यावर बरेच दिवस तिची बाग निस्तेज होती. सर्वांचे डोळे पाणावलेले होते. कोरोना कालावधी मध्ये स्मशानभूमीत देखील मर्यादित लोकांच्या संख्येने हजर राहायचे असल्याने आज्जीचे अंतिम दर्शन काही घेता आले नाही. 

आज्जी गेल्यावर आजी आमच्या अभ्यासात म्हणजे कोरोना कालावधीमध्ये जेंव्हा आम्ही प्रथम वर्ष वाणीज्यच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीचे धडे बनवत होतो त्यावेळी देखील आजीवर असा एक कविता बनवली. जी अगदीच आजी नसताना किती कसे असू शकते असे भासवू लागली. 

https://studio.youtube.com/video/27KcLqo1kZE/edit    

आजही आज्जी तुमची खंत भासते. 

अलोक पवार 

                  

11 comments:

  1. धन्यवाद अलोक, आजीच्या सुंदर आठवणींना उजाळा दिल्याबद्दल.

    ReplyDelete
    Replies
    1. तुला तर एकदम असे माझे खेचतानाचे दिवस आठवले ना

      Delete
  2. खूप खुमासदार लेखन 👌👌पण मम्मी च्या आठवणीने डोळे भरून आलेच 😥😥

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद शैला मावशी

      Delete
  3. अलोक खूपच भावूक होऊन तू मातोश्रींच्या आठवणींना उजाळा दिला आहेस. आई आमची होती सुशील, ती तर आमच्या आयुष्याचा कंदील..खूपच छान

    ReplyDelete
  4. जो आवडतो सर्वांना,तोची आवडे देवाला.अशी आमची मम्मी.सर्वांना प्रेम देणारी,मन जपणारी, स्वतःपेक्षा दुसऱ्यांचाच विचार जास्त करणारी,प्रेमाणे खाऊ घालणारी,अशी आमची मम्मी.एक वर्ष कसे पूर्ण झाले तेही कळाले नाही.दररोज तिची आठवण येत होती.एक दिवस असा गेला नाही की तिची आठवण आली नाही.म्हणतात ना मरावे परी कीर्तीरुपी उरावे असे आमचे मम्मी आणि पप्पा.पप्पांना जाऊन आता कितीतरी वर्ष लोटलीट पण आठवण मात्र दररोजची...दोघांनाही विनम्र अभिवादन.
    अलोक जावई तुम्ही खरंच खूप मार्मिक लिहिले आहे.डोळे भरुन आले वाचताना.सलाम तुमच्या लेखनाला.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सासूबाई.... मी भारी लिहितो शेवटी जावई कोणाचा आहे

      Delete
  5. आलोक खुप छान लिहिले आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद संध्या मामी

      Delete
  6. आलोक अतिशय भावस्पर्शी आणि सुंदर लेखन.मम्मी हुबेहूब उभ्या केल्यास..मम्मीने सर्वांनाच प्रेम दिले..खाऊ-पिऊ घातले.एखाद्याची चांगली गोष्ट आवडली तर त्याचे त्या भरभरून कौतुक करत असत.'गुणग्राहकता'..हा आणखी एक त्यांचा विशेष गुण होता...मी घरी गेल्यावर मला जवळ बोलावून खूप गप्पा मारायच्या..म्हणायच्या, 'करेल संध्या सगळं.तू बस इथे'...खरचं आठवणींनी डोळे भरून येतात..आलोक तू फारच छान शब्दप्रयोग केलास..'सुमनावली थंडावली'...

    ReplyDelete
  7. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

  जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक © डॉ. अलोक पवार  M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थाप...