Sunday, 1 August 2021

साधना को-हाळे : सासू निवृत्त होताना

 साधना को-हाळे: सासू निवृत्त होताना

अलोक पवार 

आयुष्य हे पळापळीचे असताना आपल्याला प्रगल्भता ही शिक्षणाने तर येतेच मात्र ही प्रगल्भता कामाच्या ठिकाणी अनुभवाने अधिकाधिक वृद्धिंगत होत असते. आणि कामाचे ठिकाण जर शैक्षणिक संकुल असेल तर या सर्व गोष्टी अगदी जोपासल्या जातात हे म्हणायला काही हरकत नाही.



लग्नाच्या वेळी आईचे शिक्षण फक्त बीए मराठी इतकेच होते. मात्र कृषी खात्यात नोकरीला असलेले विश्वासराव को-हाळे म्हणजे आमच्या बाबांशी लग्न झाल्यावर देखील फक्त गृहिणी म्हणून घर सांभाळावे अशी बाबा आणि बाबांचे मामा यांचे अजिबात मत नव्हते. त्यामुळे लगेचच आईला बी.एड करायला लावले. शिक्षण क्षेत्रातील नोकरी म्हणजे त्याकाळातली स्त्रियांसाठीची एक सुरक्षित नोकरी. १९८९ मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले. आणि १९९० मध्ये जाहिरात बघून लगेचच खडकी शिक्षण संस्थेच्या, गुलबाई मुलुक कन्या प्रशाला, खडकी येथे अर्ज केला. बाबा सोबत होतेच. त्याकाळी वकील श्री. चंद्रकांत छाजेड यांनी नियुक्ती केली. आणि आईला 'बाई' ही अजून एक नवीन ओळख मिळाली. 

शाळेत बाई म्हणणाऱ्या भरपूर मुली भेटणार पण एक वर्षाच्या तान्हुल्या लेकीचा स्वप्नालीचा प्रश्न होता. मात्र शाळेत जाऊन येईपर्यंत आजीबाई सुमन यांनी कंबर कसली होती. त्यांनी अगदी हसत हसत ही जबाबदारी स्वीकारली. आई बाबा सायकल वर स्वप्नालीला घेऊन रोज आजीकडे जायचे तिला सोडायचे आणि मग आपल्या नोकरीच्या ठिकाणी धाव घ्यायचे.

एकंदरीत बाबा आणि आजी या दोघांचा 'पण' आईच्या नोकरीकरिता लागलेला होता. त्यांनी मनापासून पाठिंबा दिला होता. आई शाळेत भूगोलाचे धडे शिकवताना रोज आदल्या दिवशी बाबांकडून भूगोलाचे धडे गिरवायच्या. अजून कसे छान शिकवता येईल यासाठी प्रयत्न करायच्या. त्यांचे मराठी देखील छान होते. अक्षर जसे की मोती. शिकवण्यात हळूहळू त्यांनी हातखंडा बसवला. आणि थोड्याच दिवसात त्यांनी विद्यार्थिनींच्या मनात देखील उत्तम शिक्षिका म्हणून स्थान मिळवले. घरी स्वप्नाली सोबत अजून एक परी काजल जन्मली होती. सुमन आजीमुळे कोणतेच टेंशन तसे नव्हते. मुली देखील मोठ्या होत्या. दोघी विमलाबाई गरवारे शाळेतून शिक्षण घेत होत्या. शाळा अभ्यास या शिस्तीच्या गोष्टी त्या अतिशय व्यवस्थित पणे आत्मसात करत होत्या. 

आणि अचानक एक दिवशी बाबा आलेच नाहीत. बाबा मिसिंग झाले. कामावरील अधिक ताण आल्याने त्यांची मानसिक अवस्था बिकट झाली होती आणि त्याच धक्क्याने ते घराबाहेर पडले ते घरी आलेच नाही. भरपूर शोधले, पोलीस स्टेशन, गाव, निवेदने सगळे झाले. स्वप्नाली नुकतीच विद्यापीठात शिक्षण घेत होती तर काजल देखील महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. आईला या दोनच नाही तर शाळेतील बऱ्याच मुली लेकींसमान होत्या. त्यांचा अभ्यास पूर्ण नाही झाला तर तेही नुकसान एक बाजूला होते. मात्र जी.एम.आय. कन्या शाळेतील इतर सहशिक्षकांनी देखील या अवघड परिस्थितीमध्ये साथ दिली होती. बाई काय अडले तर अगदी रात्री फोन करा आम्ही मदतीस येऊ हे त्यांचे बोल होते. पुढे मुली मोठ्या करायच्या आहेत त्यांचे करिअर घडवायचे म्हणून आईंनी शाळा सांभाळून सर्व करायचे असे पाहिले. मनात ताणतणाव होताच.

आई शाळेत पर्यवेक्षिका झाल्या. पाळंदे बाई मुख्याध्यापिका होत्या. त्या गेल्यावर अळगुंडगी बाई मुख्याध्यापिका झाल्या. आईंकडे शाळेची कामे वाढत होती. त्याकाळी दहावीच्या विद्यार्थ्यांनीच्या परीक्षा केंद्राची धुरा शाळेकडे आली. केंद्रप्रमुख म्हणून आईने जबाबदारी स्वीकारली.अगदी शेजारच्या आणि संस्थेच्याच आलेगावकर शाळेचे विद्यार्थी देखील आईच्या शाळेत परीक्षेस यायचे पण अत्यंत शिस्तबद्ध अशा वातावरणात आई परीक्षा पार पाडायच्या. कोणतेही गालबोट त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत लागून दिले नाही.

शाळेत मधली सुट्टी झाली की आई मुलींकडे अगदी कटाक्षाने लक्ष द्यायच्या. कोणतीही मुलगी बाहेर तर जात नाही ना हे पहायच्या. यात त्या स्वतः त्यांच्याच डब्बा खायला विसरायच्या. पालक आपल्या जीवावर मुलीना शाळेत पाठवितात मग त्यांना काय झाले तर आपण जबाबदार म्हणून त्या डोळ्यात तेल घालून आपली पर्यवेक्षिका म्हणून आपली भूमिका पार पाडत. कधी शाळा संपायच्या अर्धा तास आधी  जेवायला सुरवात तर कधी तसाच डबा घरी घेऊन आई यायची.

आमचे लग्न ठरले म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केले. लग्नाला मंजुरी दिल्यावर आईने शाळेत लेकीच्या लग्नाचे बोलून दाखवले. त्यावेळी शाळेतील श्री. दिलीप कांबळे सरांनी बाई आम्ही आहोत मदतीला काही लागले तर काळजी करू नका, असे बोलून एक मोठा आधार आईला दिला. त्यांनी फक्त बोलले नाही तर शाळेत करतात तसे अगदी सूत्रसंचालन देखील लग्न प्रसंगात सांभाळले. शाळा आईचा एक मोठा परिवारच होता. पुढे काजल चे पण लग्न झाले आणि तिच्या लग्नात देखील निलेश धिवार सर यांनी कायदेशीर बाबी हाताळून तर रमा करोते मॅडम यांनी छान संगीतमय सोहळा पार पाडला होता.

अळगुंडगी बाईंची निवृत्ती झाली. आणि काय मुख्याध्यापिका पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आईकडे आली. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पसंती जास्त असल्याने मराठी माध्यमाच्या शाळांना पसंती कमी होत होती. मुलींचा त्या शाळेतील पट वाढवणे, पट नाही वाढला तर शिक्षकांच्या बदल्या असे अनेक प्रश्न आ वासून उभे होते. इतकेच काय काही शिक्षकांच्या खाजगी आयुष्यातले प्रश्न आणि त्यांच्या कोर्ट कचेरीचे प्रश्न देखील होते. मला छान आठवते की एक शिक्षकांच्या खाजगी प्रश्नाने आईला कोल्हापूर कोर्टाने बोलावले होते. आईला एकटे कसे पाठवायचे म्हणून आम्ही सर्वच कोर्टात सोबत गेलो होतो. आम्हाला वाटले होते की अगदीच छोटं काम असेल पण अगदी फिल्मी स्टाईल ने आईला कटघरात बोलावून भगवत गीतेवर हात ठेवून शपथ घेऊन प्रश्न विचारले होते. मला हे सर्व फिल्मी डोळ्यासमोर होत आहे हे बघून आनंद झाला होता मात्र तो अनुभव आईंसाठी काही वेगळाच होता.

सकाळी गजराच्या ठोक्याला उठायचे, आवरायचे. स्वतःचा आणि दोन्ही मुलींचा देखील डबा करायचा आणि शाळेत जायचे. मुली मोठ्या झाल्याने आता आई निर्धास्त झाल्या होत्या. पण शाळेच्या जबाबदाऱ्या तेवढ्याच वाढत होत्या. आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पारितोषिके मिळवावीत हे संस्थेच्या काही सदस्यांच्या मनात होते आणि त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनीच्या संघाला मथुरेला घेऊन हॉकीच्या स्पर्धेत उतरवण्याची मोठी जबाबदारी आईकडे दिली. आईने नि:संकोच पणे फक्त संघ मथुरेला नेला नाही तर मुलींच्या संघाला राष्ट्रीय पातळीवर पारितोषिक मिळवून दिला. मुलींचे मनोबल वाढवले, त्यांना ट्रेन मधून पुण्यातून मथुरेला नेऊन परत आणणे इतके सोप्पे नव्हते पण आईने हे करून दाखवले होते. 

आईच्या शाळेत मोहन चार्य नावाचे कला शिक्षक आहेत. शाळेतील विद्यार्थिनी या देखील चित्रकला स्पर्धेत, एलिमेंटरी, इंटर्मिजीएट या चित्रकला स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या पाहिजेत ही चार्य सरांची प्रामाणिक इच्छा होती. आईसमोर ते व्यक्त झाले होते. दोघांनी संस्थेकडे ही मागणी लावून धरली होती. मात्र शाळेच्या आर्थिक धोरणांनी ही मागणी बऱ्याच दिवसांपासून आकार घेत नव्हती. काही प्रयत्न करून वर्ग मिळाला. मात्र वर्गात चित्रकला वर्गात लागतील असे वर्ग नव्हते. शेवटी आई आणि चार्य सरांनी वर्गणी काढून स्वतःच मुलींना मोठे मोठे चित्रकला पॅड उपलब्ध करून दिले. कोणतीही गोष्ट शाळेतील त्या कामांसाठी अडू नये. शाळेतल्या विद्यार्थिनी मागे पडू नयेत ही भूमिका होती आईची.

आई मुख्याध्यापिका झाल्यावर कामे प्रचंड वाढली होती. ऑनलाईनचे वारे प्रचंड प्रमाणात वाहत होते. विद्यार्थिनींची माहिती ऑनलाईन पोर्टल वर भरणे, तपासणे, बोर्डाकडे पाठवणे या वेगवेगळ्या जवाबदा-या नव्याने समोर आल्या होत्या. मुख्याध्यापक म्हणून जवाबदारी घेतली आहे तर मागे पडायचे नाही म्हणून आईने या गोष्टी आम्हाला घरी बोलून दाखवल्या. मग काय आम्ही पाच जण अगदी शाळा बंद असताना रविवारी शाळेत गेलो होतो. माने बाईंनी चावी ठेवली होती. मला आणि स्वप्नाली दोघांना महाविद्यालय आणि विद्यापीठाचे काम होते. त्यामुळे तोच दिवस होता जेमतेम मात्र स्वप्नील आणि काजलने या कामासाठी पुरेपूर वेळ देऊन हे काम मार्गी लावले होते. त्यावेळी प्रत्येक शिक्षक शिक्षिका आणि प्रामुख्याने सौ. डामसे बाईंनी अगदी छान मदत केली होती. 

आईच्या शाळेतल्या झांबरे बाई यांना नेहमी मी आमच्या गाववाल्या म्हणतो कारण त्याही धनकवडीमध्येच राहतात. लेकीच्या घराजवळ राहायला आहेत म्हणून झांबरे मॅडम आणि आमच्यामध्ये स्नेहाचे वातावरण होते.

आमच्या घरात एक नवीन पाहुण्यांचे आगमन झाले. काजल आणि स्वप्नील यांना पुत्ररत्न झाले. आणि योगायोग म्हणजे शाळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  बंद होती. सर्व काही झूम, गुगल अशा ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. अद्विकला बघणे आणि वाढवणे ही नैतिक जवाबदारी आईच्या लक्षात आली. मुलीचे करियर करताना सुमन आजीने जी भूमिका बजावली होती ती तिने अगदी चोखपणे बजावली होती. म्हणूनच कदाचित आईचे शिक्षण आणि आईची मुख्याध्यापक पदी वर्णी लागली होती. म्हणजे खरंच आजीचा यात सिंहाचा वाटा होता. अद्विक झाल्यावर आईला आता स्वतःच्या करियरला ब्रेक द्यावासा वाटला कारण काजलचे करियर आणि नातवाची जवाबदारी स्वीकारावी असे आईच्या मनात घोळायला लागले. सुमन आजी आता नाही पण तिचे आईवरचे संस्कार आईवर तितकेच ठासून होते. म्हणून २०२१ मध्ये आईने स्वेच्छा निवृत्ती घेण्याचे ठरवले. संस्थेतील लोकांना ही बातमी कळाली तेंव्हा त्यांनी अजून दोन वर्षे राहिली आहेत तर पूर्ण करा नोकरी असे सांगितले पण आई त्यांच्या मतावर ठाम होत्या. शाळेतल्या शिक्षकांना - शिक्षकेतर सेवकांना ही बातमी कळल्यावर त्यांच्यावर तर आभाळ कोसळले होते. 

३१ जुलै २०२१ ला आईच्या सेवानिवृत्ती चा कार्यक्रम झाला. शाळेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी काही ठराविक विद्यार्थिनी कोरोनाच्या काळातही एकत्र आले होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या लाडक्या बाईंसाठी कविता म्हणून दाखवली. शाळेतील शिक्षक शिक्षकांनी त्यांच्या आवडत्या बाईंना साडी, शेला, दत्ताची मूर्ती, बांगड्या अशा भेटवस्तू दिल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या आणि काही शिक्षकांच्या अश्रुधारा थांबत नव्हत्या. कार्यक्रमात दोघे मामा रवींद्र आणि किशोर सपत्नीक आले होते. मामालाही जेंव्हा बहिणीचे इतके कौतुक झाले तेंव्हा आजीची आठवण झाली तोही गहिवरून आला. 

आई दुसऱ्या दिवसापासून आयुष्याच्या एक दुसऱ्या पैलूकडे जाणार आहे. सेकंड इनिंग अद्विक मुळे सुरू झाली. आयुष्य अजून खूप बघायचे आहे, आज ती स्वप्नाली आणि काजल यांच्या आईसोबत बाबांच्या नसण्याने बाबांचीही भूमिका कोणताही संकोच न बाळगता बजावत आहे. जी.एम.आय. ने या सर्व प्रवासात अगदी तब्बल ३१ वर्ष परिवार म्हणून साथ दिली. ती साथ अजूनही असणार आहे. आईच्या या नवीन आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा!!!


जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

  जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक © डॉ. अलोक पवार  M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थाप...