Saturday, 19 December 2020
कविता चौहान : शिक्षण माऊली
Thursday, 10 December 2020
जाणती राणी : प्रतिभा मधुकर पवार
जाणती राणी : प्रतिभा मधुकर पवार
प्रा. पवार अलोक अर्जुन अलका
१ जानेवारी १९८१ साली साली रामचंद्र सुतार राहणार महुडे, ता. भोर, जिल्हा पुणे यांना कन्यारत्न प्राप्त झाले. आपल्या या प्रतिभाशाली कन्येचे नाव त्यांनी प्रतिभा हे ठेवले. प्रतिभा यांचे शिक्षण दहावी इतकेच झाले. घरच्या परिस्थितीमुळे प्रतिभा यांना खूप जास्त काही शिकता आले नाही. १६ जून १९९७ या त्यांचे लग्न आळंदेवाडी, ता. भोर, जि. पुणे च्या मधुकर भगवान पवार यांच्यासोबत झाले. मधुकर पवार यांची परिस्थिती देखील बेताचीच होती. मात्र म्हणतात ना घरातल्या स्त्रीने जर ठरविले तर झोपडीला पण महाल बनायला वेळ लागत नाही. पण प्रतिभाजींचा हा संघर्ष देखील पाहावा तितका सोप्पा नव्हता. मधुकर हे सुतार काम करीत. या कामामुळे पाहिजे तितके उत्पन्न हातात प्राप्त होत नव्हते. त्यामुळे प्रतिभा यांनी स्वत: घराबाहेर पडून काम करण्याचा निश्चय केला. कारण घरी आपली वृद्ध सासू, आपली दोन लेकरे चेतन आणि अजित ही देखील आपली नैतिक जवाबदारी आहे असे प्रतिभाताई आणि मधुकर पवार हे दाम्पत्य व्यवस्थित पणे जाणून होते. त्यामुळे प्रतिभा या स्वत: टी. ई. कनेक्टीव्हिटी नावाच्या शिरवळच्या कंपनीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. या कंपनीमधील वायरिंग चे काम प्रतिभाताई शिकल्या आणि दरमहा जो पगार मिळतो त्यावर हे कुटुंब हळूहळू आपला संसार चालवू लागले.
पुढे मधुकर पवार यांना गावातले ग्रामपंचायत सदस्यत्व मिळाले. आपले गाव हळूहळू सुधारावयाचे आहे यासाठी मधुकर पवार यांनी बरेच प्रयत्न या ग्रामपंचायत सदस्य मिळाल्याच्या कारकिर्दीत केले. दहा वर्षाच्या या कालखंडात गाव 'हागणदारीमुक्त' झाले. आळंदेवाडी या गावासाठी हा मोठा नावलौकिक होता. हे गाव व्यवस्थित व्हावे हे प्रत्येक गावकऱ्यांचे स्वप्न म्हणावयास हरकत नाही. त्यासाठी गावातच एक छोटी प्राथमिक शाळा सुरु झाली. या शाळेला अगदीच छोटेसे स्वरूप होते.
२०१५ साली गावातील महिला सरपंच पदाचे आरक्षण ओबीसी या पदासाठी आरक्षित झाले. घरची बेताची परिस्थिती असणाऱ्या या प्रतिभाजींना राजकारणातला किंवा समाजकारणातला लवलेशही नव्हता. मात्र बऱ्यापैकी गावाची आशा या सरपंच पदासाठी योग्य उमेदवार या 'प्रतिभा पवार' याच होत्या. कारण ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचे नाजूक परिस्थितीमध्ये घर सांभाळले होते तसेच आता गावाला देखील सांभाळायचे होते. गावाला एक नवीन दिशा द्यायची होती. संपूर्ण गावाची जवाबदारी मी सांभाळू शकते का? सरपंच पद मग मला शक्य होईल का? माझ्या कामात काही चूक झाली तर? माझे शिक्षण मला या गावाच्या समस्या समजण्यासाठी कमी पडले तर? या सर्व गोष्टी प्रतिभाजींच्या डोक्यात थैमान घालत होत्या. घरामध्ये अजित - लहान मुलाचे आजारपण देखील प्रतिभा यांना बघायचे होते. मात्र मधुकर पवार यांनी ही सर्व जवाबदारी आपण व्यवस्थित पेलवू शकतो असे खंबीर आश्वासन प्रतिभा पवार यांना दिले. आणि काय ०७ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रतिभाताई आळंदेवाडी गावाच्या दुसऱ्या महिला सरपंच झाल्या. त्यांच्या सरपंच पदाचे कौतुक म्हणजे गावातून लोकांमधून निवडून आलेल्या त्या पहिल्याच महिला सरपंच होत्या. त्यांच्या सरपंच पदाची मिरवणूक गावातल्या लोकांनी खूप मस्त काढली.
सरपंच पद भेटल्यावर त्या पदावर किंवा त्या पदाचा गैरवापर करून घरामध्ये किंवा आपल्या नातलगांचा फायदा होईल अशी बाब प्रतिभाजींना कधीच नव्हती. त्यामुळे आपल्या पतीकडून आणि गावामधील ग्रामसेविकेकडून जी योग्य माहिती मिळेल त्या आधारे त्या आधारे प्रतिभाताई आपले काम चोखपणे करीत होत्या. आपल्याला परिस्थितीमुळे शिकता नाही आले तर गावातील लहानग्यांना या गोष्टीचा कुठेही त्रास होऊ नये म्हणून त्यांच्याच सरपंच पदाच्या कालावधीमध्ये पहिले धडाडीचे काम झाले ते गावातील आपली साधी शाळेची डागडुजी करण्याचे काम व्यवस्थितरित्या पूर्ण झाले. आणि या कामामध्ये सर्व तरतुदी झाल्या पाहिजेत यासाठी खुद्द खासदार मा. सौ. सुप्रिया सुळे यांच्या प्रोत्साहानात हे काम झाले. सुळे या कामाच्या पूर्ततेसाठी दोन वेळा गावातही आल्या. प्रतिभा पवार यावरच थांबल्या नाहीत. गावातला कच्चा रस्ता पक्का करणे, सांडपाण्याचा निचरा होण्याची सोय असेल घरोघरी नळ बसविण्याची मोहीम असेल सर्व कामगिरी त्यांच्या कारकीर्दीमध्ये सर होत होती. खंडोबाच्या वाडीमधील अंतर्गत रस्ते असतील किंवा तेथील अंगणवाडीतील फर्निचर दुरुस्ती असेल किंवा तेथील विद्यार्थ्यांच्या शौचालयाची दुरुस्ती असेल या सर्व कामांची दखल प्रतिभा पवार यांनी चोख पणे केली. तसेच आपल्या या पाच वर्षातील सरपंच पदाच्या जे जुने ग्रामपंचायत कार्यालय आहे त्याचे देखील नूतनीकरण प्रतिभाजींनी व्यवस्थितरित्या केले. तसेच याच कालावधीमध्ये गावामध्ये स्मशानभूमी बांधकाम आणि संपूर्ण गावाला ज्या विहिरीने पाणीपुरवठा होतो त्या विहिरीवर जाली बसविणे अहि दोन महत्वाच्या कामांसाठी प्रस्ताव दाखल करण्याचे काम यांच्याकडून पाठविण्यात आला. ग्रामपंचायतीला एलईडी टीव्ही देण्याचे कामही याच काळात झाले.
या सर्व ग्रामपंचायतिची कामे करताना कुठेही घरी देखील आभाळ कोसळू नये यासाठी त्यांनी आपली नोकरी देखील सोडली नाही. पाच वर्ष सरपंच असताना देखील त्या त्यांच्या शिरवळच्या कामाला व्यवस्थित पणे जात होत्या.
प्रतिभा पवार यांनी नुकतेच आपल्या मोठ्या मुलाचे लग्न लावून दिले. कोरोना कालावधीमध्ये अगदी थोडक्या लोकांमध्ये हे लग्न लावले. आपल्या मुलांना थोडे घर पण मोठे झाले पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या पतीच्या मागे लागून जुन्या घराचे बांधकाम सुरु केले.
२०१८ साली आमचा संपर्क प्रतिभाताई यांच्याशी आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचचे हिवाळी शिबीर नेण्यासाठी झाली. असा कोणत्याही प्रकारचे शिबीर त्या गावामध्ये यापूर्वी आले नव्हता. आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या या शिबिरातूनआपल्या गावाला नक्कीच फायदा होईल विकास कामे होतील या हेतूने आमच्याकडून माहिती एकूण प्रतिभा ताई यांनी लगेच होकार कळविला होता. सरपंच असूनही स्वत: आमच्यासाठी बिनादुधाचा चहा प्रतिभाजींनी आमच्यासाठी प्रथम: केला होता. आम्हाला चहाची अत्यंत गरजच होती. त्यावेळी तो चहा अतिशय सुंदर लागला होता. त्यांनी लगेचच इतर सदस्यांना फोन लावून आमच्या शिबिराची मान्यता दिली होती. गावात शिबिराचे उत्घाटन करताना प्रतिभा ताई यांनी आम्ही आवर्जून या असे म्हणालो होतो, मात्र मोठ्यांना आणि प्रामुख्याने गावातील पुरुषांना मन द्या असे त्यांचे म्हणणे होते. मात्र तुम्ही सरपंच आहात आणि तुम्हीच मानकरी म्हणून आल्या पाहिजेत अशी आमची अट होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता प्रतिभा ताईंनी आमच्या शिबिराचे उत्घाटन केले. आठ दिवस आमच्या शिबिरात त्या जातीने लक्ष द्यायला यायच्या मुलांना माझ्या घरून पाणी प्यायला द्या त्यासाठी त्यांना बादल्या व कळशीची सोय ताईंनी व्यवस्थित मार्गी लावली होती. त्याच वेळी संकष्टी चतुर्थी आली होती. सर्व पोरांना माझ्याकडे गणपतीच्या आरतीला घेऊन या असे त्यांनी मला आवर्जून सांगितले. प्रत्येक मुलासाठी त्यांनी मोदकाचा प्रसाद करून ठेवला होता. आमच्या मार्गदर्शन कार्यक्रमांना त्या आवर्जून येऊन बसायच्या.
शिबीर पूर्ण झाले आमचा समारोप झाला. मात्र पुढे जानेवारीमध्ये मी आणि माझा विद्यार्थी आकाश कोल्हे आम्ही पुन्हा तीन दिवस अगदी राहायच्या निमित्ताने पुन्हा गावात गेलो. पुन्हा स्वच्छता शिबीर पार पाडायचे होते. आकाशला बघून त्यांनी हाच ना तुमचा हुशार विद्यार्थी आकाश असे अगदी लगेच ओळखले. आकाशने गावात तीन दिवस स्वच्छतेचे केलेले काम पाहून प्रतिभा पवार यांनी आकाशला लगेच ग्रामपंचायत मध्ये बोलून प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
सरपंच असताना कोणत्याही प्रकारे मी सरपंच आहे या गोष्टीची शेखी न मिरवता साधेपणानी प्रतिभा जींनी गावात एक वेगळ्या प्रकारे एक आदर्श सरपंच कशी असावी हे दाखवून दिले. त्यांना सरपंच पदाचा लोभ कधीच नव्हता. दिनांक ५ नोव्हंबर २०२० रोजी प्रतिभा पवार यांचे सरपंच पद संपुष्टात आले. मात्र त्यांनी गावासाठी पुरेपूर कामे केली. गावाचा डोळ्यांनी दिसणारा विकासच हे सर्व बोलून दाखवतो.
मात्र ५ डिसेंबर २०२० रोजी काळाने प्रतिभा पवार यांच्यावर घाला घातला. एका लग्नाला मुलासोबत टू - व्हीलर वर जात असताना अपघात होऊन प्रतिभा ताई मृत्युमुखी झाल्या. जातानाही त्यांनी गाडी चालविणाऱ्या मुलाला काहीच झाले नाही याची दक्षता त्यांनी घेतली. कदाचित त्यावरचेही संकट प्रतिभा पवार यांनी स्वतवर ओढून घेतले. आपल्या नवीन घरामध्ये सुखी संसाराचे स्वप्न त्यांचे अर्धवट राहिले. मात्र गावामध्ये त्यांनी गावाला दिलेली प्रतिभा ही गावामध्ये कायम राहिली असे म्हणायला काहीच हरकत नाही. या जाणत्या राणीला सर्वांना समजावून घेणाऱ्या प्रतिभाजींना माझा अखेरचा सलाम ....
जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक
जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक © डॉ. अलोक पवार M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थाप...
-
रमाई आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून कळलेले प्रेमी बाबासाहेब डॉ. अलोक पवार नुकतीच ७ फेब्रुवारी ला रमाई आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारताने साजर...
-
त्यांनतरच्या वेदना गुगल वरच्या बातम्या वाचताना महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण विभाग प्रमुख रुपालीताई चाकणकर यांची एक बातमी नजरेस पडली...
-
सावित्रीबाई फुले : दि मॅनेजमेंट गुरु © डॉ. अलोक पवार आज सावित्रीबाई फुले यांच्या विषयी काहीतरी वेगळे विचार मांडावेसे वाटले. "सावित्री...




