कविता चौहान : शिक्षण माऊली
प्रा. अलोक पवार
मराठी पाऊले चालती पुढे, हे वाक्य महाराष्ट्रातल्या मातीतल्या सर्वानाच माहिती. मात्र मराठीतल्या मातीमध्ये चालण्यासाठी त्याच मातीशी नाळ बांधून देणाऱ्यांंपैकी एक म्हणजे आमच्या कविता चौहान मॅडम. महाविद्यालयात शिकवताना विद्यार्थी आधीच पक्का नसेल तर आम्हा महाविद्यालयीन शिक्षकांना फार डोकेफोड करावी लागते. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनात जर पाया भक्कम नसेल तर पुढे कुठेतरी खडतर आयुष्य जगावे लागते. बऱ्याच लहान मुलांच्या आयुष्यात हे शिक्षणाचे बीज रुजले जातच नाही. म्हणजे परिस्थितीमुळे, खायची मारामार असेल ना तर पाहिले प्राधान्य शिक्षणापेक्षा जगण्याच्या धडपडीकडे दिले जाते.
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात उस्मानाबादमधील आदिवासी भागातून बरेच लोक रस्त्यावर हार करण्यासाठी पथारी मांडून राहतात. हे सर्व लोक आपल्या पोट पूजेसाठी हार बनवून जरी रस्त्यावर विकत असतील तरी त्यातून भागत नाही म्हणून यांची मुले रस्त्यावर भीक मागण्याचे काम करतात. या मुलांना शालेय शिक्षणाची गोडी आणि माध्यन्य भोजनाची सोय लागावी म्हणून मी २०१९ मध्ये सर्वेक्षण केले होते. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांचे आडनाव पवारच होते. त्यामध्ये मला एक मुलगा भेटला जो आधीच शाळेत जात होता. त्याने मला तिथे रस्त्यावरच त्याचे शाळेचे प्रगती पुस्तक काढून दाखवले तर त्याच्या वर्गशिक्षक मॅडमचे नाव होते सौ. कविता चौहान. तो शाळेचे आणि खास करून त्याच्या बाईंचे इतके कौतुक करीत होता की त्याला कविता मॅडम म्हणजे त्याच्या अंधारमयी जीवनात एक प्रकाशाचा किरण भेटला. आपल्याला अभ्यास करायचा असतो, इतकेच माहिती असते पण त्या अभ्यासाने आपण आपली दिशा कशी बदलू शकते हे त्या मुलांच्या बालमनाला सुंदर पटले होते. त्याला हे कविता मॅडमच्या सततच्या मार्गदर्शनानेच साध्य झाले असावे. मॅडम देखील या मुलांविषयी बोलताना आत्मीयतेने बोलत असतात. कोरोना काळामध्ये ही मुले रस्त्यावरून गायब झाल्यावर ती नक्की कुठे आहेत त्यांचा शोध लागतो का हे बघण्यासाठी कासावीस झालेल्या मॅडम आम्ही बघितल्या आहेत. त्यांचे हे समाजकार्य अथांग आहे.
कविता चौहान यांनी डीएड पूर्ण झाल्यावर इतिहासात बीए आणि बीएड देखील पूर्ण केले. पोलीस खात्यात उच्च पदस्थ नोकरी करणारा नवरा असूनही एक स्त्री म्हणून आपली वेगळी ओळख असावी म्हणून सौ. चौहान यांनी शाळेतल्या मुलांना शिकवायला सुरवात केली. बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी खडकवासला, शिवणे अशा लांबच्या शाळांमध्ये नोकरी करूनही मॅडमच्या चेहऱ्यावर थकवा नसून आपण लहान मुलांवर कष्ट घेतोय या गोष्टीची लकाकी दिसून यायची. जिल्हापरिषद शाळा, भिमाले हायस्कुल, संदेश नगर अशा शाळांमध्ये नोकरी करून सध्या कविता मॅडम संत ज्ञानदेव हायस्कुल, मुकुंद नगर येथे कार्यरत आहेत. शाळेसाठी शाळाबाह्य मुले शोधायची, त्यांना शिकवणे हे महत्वाचे असतेच पण कविता मॅडम थोडा वेगळा प्रयत्न करताना दिसतात. या मुलांना त्या शिक्षण प्रवाहात टिकायचे कसे याबद्दल ज्ञान देताना दिसतात. ३६ वर्षाच्या या ज्ञानदानाच्या प्रवासात त्यांनी बरीच मुले घडवली. त्यांच्या याच कार्यासाठी पुणे महानगरपालिकेने त्यांना 'आदर्श शिक्षका' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
श्री स्वराज एज्युकेशन सोसायटी, धनकवडी, पुणे म्हणजेच माझ्या स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज या महाविद्यालयाच्या संस्थेच्या सौ. कविता चौहान या माननीय सदस्या आहेत. आमच्या कामातील होणाऱ्या चुका कविता मॅडम आम्हाला अगदी एक चोखंदळ मार्गदर्शकाप्रमाणे समजावून सांगत असतात.
कविता मॅडम यांचे सुपुत्र अभिजित हे आमच्याशी बोलताना मॅडमविषयी माहिती विचारल्या वर पहिले आम्हाला सांगतात की, "माझी आई ना सुंदर आहे, आणि त्यामुळेच मी असा स्मार्ट आहे". खरंच प्रतिभासंपन्न अशा कविता चौहान मॅडम या फक्त दिसण्यातच नव्हे तर त्यांच्या कार्यातही सुंदर दिसून येतात.
आज २० डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्यावरील थोडेसे टिपण...…


No comments:
Post a Comment