Thursday, 11 January 2024

जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

 जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

© डॉ. अलोक पवार 

M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD

जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थापन या विषयांचा अभ्यास आपण सुरु करतो त्या व्यवस्थापनाच्या अभ्यासात आपल्याला बाहेरील देशांच्या अभ्यासू आणि त्यांनी लिहिलेल्या तथाकथित गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. भारतात राहून या सर्व अभ्यासू लोकांनी मांडलेल्या विविध मोठ्याला थेअरी त्यांचे संशोधन याचा जेंव्हा अभ्यास होतो तो चुक नसतो मात्र आपल्या इथे त्याचं सर्व थेअरी जेंव्हा आपल्या इथल्या लोकांसमोर मांडल्याचं जात नाहीत तेंव्हा आपल्या लोकांचे गमकच आपल्या लोकांपासून वंचीत राहते. आपल्या येथे पण कुशल राज्यकर्त्ये आहेत का तर आहेत. पण ठराविक पुरुष केंद्रित राज्यकर्त्यांच्या इतिहासात स्त्रियांचे राज्य आणि त्यांनी राज्य टिकवून ठेवण्यासाठी वापरलेला हातखंडा कुठेतरी कमी पडताना दिसतो. आणि त्यातच कुठेतरी आपल्याकडे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांची जयंती जेवढ्या उत्साहाने साजरी होते तेवढ्या उत्साहाने त्यांची माता आपली माता जिजाबाई हिची जयंती तुरळक पणे काही लोक साजरी करतात. त्यांच्या जयंतीला त्या कुशल राज्यकर्ती म्हणजे एक उत्तम प्रशासक (Leader) कशा होत्या हे सांगण्याचा प्रयत्न या लेखात मी केला आहे.



महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या नावात जरी राजे असले तरी प्रमुख्याने सुरवातीला ते निजामशाहीमध्ये चाकरी करत होते. त्यांचे वडील मालोजी राजे भोसले हे देखील मुघलांच्या कडे होते. त्यांना जहागिरी म्हणून महाराष्ट्रातील पुणे ( त्याकाळाची पुणवडी) आणि सुपा हे दोन प्रांत मिळाले होते. शहाजी राजे यांना निजामांकडे चाकरी असल्याने फिरती ही नेहमीच होती. मात्र ही फिरती सपत्नीक करावी हे शक्य नव्हते म्हणून जिजाऊ यांची रवानगी पुण्यात झाली. अगदीच बालपणी विवाह झाल्याने जिजाऊंने सगळ्या गोष्टी माहेरी शिकल्या असे काहीच नव्हते. मात्र सिंदखेडा, बुलढाणा ते पुणे या प्रवासात त्यांनी शेतीवाडी बघितली होती. शेतकऱ्यांच्या कष्टांची त्यांना जाणीव होती. पुण्यात आल्यावर त्यांनी पुण्याची दयनीय अवस्था पाहिली. पुण्यात गाढवाला घेऊन शेतात नांगर फिरवला जातोय हे त्यांनी पाहिलं. इथल्या शेतकऱ्याच मरण त्यांनी पाहिलं आणि पाहिला धडा बाल शिवबांना दिला तो म्हणजे शेतीचा धडा. त्यांनी सोन्याचा नांगर तयार करून घेतला आणि तो या पुण्याच्या काळ्या मातीत नांगरून इथली माती कसदार केली. स्वतः शेतामध्ये जेंव्हा ही जिजाऊ नांगर घेऊन उडी घेते तेंव्हा ती व्यवस्थापकाचा महत्वाचा गुण 'प्रेरणा' (Influencer) समोर आणते. जो पर्यंत व्यवस्थापन प्रेरणा देत नाही तो पर्यंत बाकीचे लोक प्रेरित होऊन त्या व्यवस्थापनेत आपले काम उत्तम रित्या करीत नाही. जिजाऊंची ही प्रेरणा देण्याची कामगिरी त्यांच्या शेवटपर्यंत होती. आणि तिच प्रेरणा अजूनही आपल्याला ऊर्जा देत राहते.

सध्याच्या आयांना आपली मुले कशी घडतील याची चिंता नेहमी सतावत राहते. माझ अपत्य चांगले शिकते का? त्याला चांगली नोकरी मिळते का? त्याचे आयुष्य पुढे जाऊन योग्य होते या विचारांत आपल्याला सध्याचे पालक त्यामध्ये प्रमुख्याने आई पुढे दिसते. चिंताग्रस्त झालेली आई मुलाला कसे पुढे नेता येईल याचे गणित रात्रंदिवस बघत असते. जिजामाता यांनी देखील आपल्या बाल शिबवाला असेच काही घडवले मात्र शिवबांबरोबर त्यांना पुण्यातील इतर तरुणांची पण चिंता होती. शिवबांना मोठे करता करता त्या त्यांना रामाची कथा सांगायच्या. रामायनातील राम त्या शिवाजींच्या समोर एक महान योद्धा कसा असतो हे उलघडून सांगायच्या. त्याने कसे रामराज्य स्थापन केले, अहंकारी रावणाचा कसा अंत रामाने केला या कथा ऐकून बाल शिवाजी प्रेरित व्हायचे. भीम आणि बकासुर, कृष्ण आणि कंसाच्या गोष्टीतील नात सांगताना आपल्याच लोकांनाकडून कसा धोका असू शकतो हे देखील त्या उलघडून सांगायच्या. कदाचित त्यांच्या माहेरच्या लोकांकडून जी गद्दारीची सबब जाधव - भोसले युद्धातून मिळाली त्याचं चित्रण त्या या बाल शिवाजींच्या समोर उघडून काढत. म्हणजे प्रात्यक्षिकाबरोबर थेअरी पण किती महत्वाची आहे हे जिजाऊ आपल्या नवनिर्वाचित व्यवस्थापन कर्त्याला समजावून सांगे. नवीन व्यवस्थापक निर्मिती करणे ( Leader Development) हे आणखीन एक व्यवस्थापका चे कार्य जिजाऊंने केले असे म्हणायला हरकत नाही.

आयांची चिंता हा जेंव्हा विषय आपण बघतो तेंव्हा आपला मुलगा व्यवस्थित मार्गी कसा लागेल याचे टेन्शन त्यांना असते. जिजामातेला फक्त एका बालकाचे टेन्शन नव्हते तर संपूर्ण पुण्याचे टेन्शन त्यांना होते. पुण्यात वास्तव्यास असलेल्या लालमहालाच्या बाल्कनीतून त्यांना अवघे पुणे दिसायचे. मात्र त्याचं पुण्याच्या एका बाजूस असलेला कोंढाणा किल्ला त्यांना पुण्याच्या भीतीचे वातावरण दाखवायचा.

म्हणजे जागेपणी स्वप्न बघायचे ना तर ते जिजाऊंसारखे. त्यांनी लगेचच आपल्याला हा कोंढाणा आपल्या पुण्यात जोडायचा ही इच्छा महाराजांच्या समोर बोलून दाखवली. मुलाच्या लग्नामध्ये व्यस्त असलेल्या तानाजी मालुसरे यांना या कामगिरी मध्ये खेचण्यात आले. आणि तानाजी मालुसरे यांनी देखील या कामगिरी मध्ये ' आधी लगीन कोंढण्याचे आणि मग माझ्या रायबाचे ' ही घोषणा दिली. मात्र जेंव्हा या मोहिमेत गड काबीज करूनही तानाजी महाराजांचा बळी गेला तेंव्हा तानाजी मालुसऱ्यांची आपल्या परिवारातील शेवटचे जे कार्य अपूर्ण राहिले होते ते कार्य स्वतः जिजाऊंच्या नजरे समोर पूर्ण झाले. जिजाऊंनी स्वतः रायबाचे लग्न लावून दिले. त्याच्या पत्नीला सदिचोळीचा आहेर देऊन ते लग्न पार पाडले. गड आला पण आपला सिंह गेला यातील तानाजी ला सिंहाची उपमा मिळाली आहे त्यामधून माणसे ओळखण्याची आणि त्यांना सोबत ठेवण्याची जी परख आहे ती महाराजांना जिजाऊंकडूनच मिळाली. माणसांशिवाय थोडी व्यवस्थापन शाबूत ठेवता येते.

शिवाजी महाराज जेंव्हा वेगवेगळ्या दोऱ्यांवर जात तेंव्हा इकडे पुणे सांभाळण्याची जवाबदारी सुद्धा व्यवस्थित सांभाळत. आग्र्याची मोठी फेरी असेल किंवा युद्धाच्या वेळी आपला मुलुख सांभाळण्याची मोठी जवाबदारी म्हणायला हरकत नाही. त्यावेळी जिजाऊ मोठ्या दिमाखाने ही सर्व कामगिरी फते करीत. नाही म्हणजे ज्या जिजाऊंनी महाराजांना तलवार बाजी असेल दांडपट्टा चालण्यात तरबेज केले त्या जिजाऊंना हे फारसे अवघड काम नव्हते. एकंदरीत नियंत्रण ( Controlling) चे मोठे काम पण जिजामाता मोठ्या दिमाखाणे करीत.

राहून राहून आपण जे स्वराज्य निर्माण केलंय त्यावर आपले अधिशासन असावे ही देखील इच्छा जिजाऊंचीच. त्यामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील झाला पाहिजे हे आपल्या डोळ्यादेखत जिजाऊंनी पूर्ण करून घेतलेले अखेरचे स्वप्न. योग्य माणूस, मालमत्ता, मशीनरी ( साधने), पद्धती आणि चलन यांचे योग्य नियोजन त्यांनी दाखवून दिले.

अशा या कुशल व्यवस्थापिकेला माझे विनम्र अभिवादन..

डॉ. अलोक पवार

१२ जानेवारी २०२४

Wednesday, 3 January 2024

सावित्रीबाई फुले : दि मॅनेजमेंट गुरु

 सावित्रीबाई फुले : दि मॅनेजमेंट गुरु

© डॉ. अलोक पवार



आज सावित्रीबाई फुले यांच्या विषयी काहीतरी वेगळे विचार मांडावेसे वाटले. "सावित्रीबाई फुले : दि मॅनेजमेंट गुरु", हा म्हणजे त्या काळी एम. बी.ए. अशी पदवी भारतामध्ये अस्तित्वातच नव्हती. आणि स्त्री असलेल्या सावित्रीबाईंनी ती मिळवली होती असेही नव्हते. मात्र तरीही सावित्रीबाईंना मॅनेजमेंट गुरु म्हणणे हे थोडे विचार करण्यासारखे नाही. एखाद्याला खरे व्यवस्थापन कळले आणि त्या व्यवस्थापनातील कार्य त्याला व्यवस्थित रित्या कळली तर तो मॅनेजमेंट गुरु म्हणून गणला जातो. आमच्या मॅनेजमेंट मध्ये पाच कार्य अतिशय महत्वाची म्हणून समोर येतात, प्लॅनिंग ( नियोजन), ऑर्गनिझिंग ( आयोजन), स्टाफिंग ( कर्मचारी जोपासना), लीडिंग ( नेतृत्व) आणि शेवटचा कंट्रोलिंग ( नियंत्रण) या पाचही कार्यांकडे बघता या सावित्रीबाई फुले यांची जीवन गाथा कशी समर्पक आहे हे दिसून येते.

प्लॅनिंग या कार्यामध्ये काही Goal निर्माण करावे लागतात. काही Action प्लॅन करावे लागतात. रिसॉर्स निर्माण करावे लागतात. नऊ वर्षाची सावित्री जेंव्हा आपल्या शेठजींना शेतात दुपारचे जेवण घेऊन जायच्या तेंव्हाच त्या ठिकाणी त्या स्वतःचा Future प्लॅन सेट करीत होत्या. त्या अ आ इ ई चे धडे गिरवत होत्या. माझे मिळवलेले शिक्षण फक्त माझ्या पर्यंत नं राहता ते अन्य मुलींपर्यंत पण पोहोचले पाहिजे याचा प्लॅन देखील त्यांचा महात्मा फुले यांच्या मार्फत पुढे पास होत होता. घरून हाकलून दिले तरी त्याचे action plan अगदी फिट्ट होते.या सर्व प्लॅनिंग नेच पुण्यामध्ये मुलींची शाळा निर्मिती करणे, अभ्यासक्रम निर्मिती करणे त्याला फलित रूप देणे या सर्व गोष्टींचा समावेश होता.

Organisation आयोजन या कार्यामध्ये सध्या काय काय होत आहे यावर लक्ष केंद्रित केले जाते. आमच्या सावित्री माईने शाळांची निर्मिती करून मुलींना एका प्रकारे विद्येची दारे उघडून दिली होती. मुली नियमित शाळेत आल्या पाहिजेत, त्यांच्या शाळेत येण्यात खंड पडणार नाही याची तजवीज त्या करीत. पालकांना मुलींनी शिकले पाहिजे याबाबत त्या पुढाकार घेत. त्यांनी एक दोन नाही तर १९४८ ते १९५२ या चारच वर्षात एकूण १८ शाळा खोलल्या होत्या. शक्य आहे का एकूण एवढ्या अठरा शाळांच नियोजन. जमणार का आत्ताच्या संस्थापकांना. बर मुलांकडून फी नं घेता जमणार का शाळा चालवायला. जमणार का शिक्षकांचे पगार द्यायला. या फुले दाम्पत्यांनी हे साक्षात सत्यात करून दाखवले होते. याचं सोबत त्या काळातला एक कळीचा मुद्दा होता तो म्हणजे गोर गरिबांसाठी पाण्याची सोय. त्या काळाच्या दलितांना पाणी मिळणे हे त्यांच्यासाठी जिकिरीची काम होते. सावित्रीबाईंनी त्यांच्या घरासमोरचा हौद हा सर्वांसाठी खुला केलेला होता. आपली गोष्ट अशी परक्यांसाठी देणे याला जिगरा लागतो. आणि तो घेऊनच ही माऊली जन्माला आली होती. हे होत तिचं Orgnisation.

तिच्याकडे हे सांभाळण्याची त्याचं नेतृत्वं Leadership करण्याची एक वेगळीच कला होती. तो बदलावं तिचं आणू शकली असे देखील म्हणायला हरकत नाही. तिला तिच्या शाळेच खुळ म्हणून तिच्या सासरच्यांनी घराबाहेरचा रस्ता दाखवला तेंव्हा तिने महात्मा फुले यांच्या मित्राकडे उस्मान शेख यांच्या घराला आपले निवास स्थानच बनवले नाही तर तिथे देखील शाळेची निर्मिती केली.

आज ज्या विविध समाजातील, विविध स्तरावरच्या मुली शिकतात नं ते त्यांचंच नेतृत्वं म्हणायला हरकत नाही. रोज शाळेत जाताना शेणा दगडाचा मारा व्हायचा. पण जेंव्हा समोर दांडगा माणूस येऊन उभा राहतो त्याच्या कानशीला लगावल्या शिवाय खंबीर नेतृत्वं उभ राहील नसत. आजच्या रडक्या मुलींना ती कानाखाली मारलेली हे सांगताना सावित्रीबाई फुल्यांचं खमक नेतृत्वं पुढे येताना दिसत.

Staffing म्हणजे योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी योग्य वेळेला उपलब्धी करून देणे. सावित्रीबाई फुले यांना एकटीला त्यांनी स्थापलेल्या एकूण अठरा शाळांना एकावेळी जाने शक्य नव्हते. बर महात्मा फुले यांच्या कडून पैशांची बांधणी ही शाळेतून भागणारी नव्हती. ज्योतिबा यांना शेताकडे आणि त्यांच्या त्या काळाच्या व्यवसायात रस्ते, धरण बांधणी याकडे अर्थाजन म्हणून बघावे लागतंच. मग अजून शिक्षकांची निर्मिति झालीच पाहिजे यासाठी ज्या उस्मान शेख यांच्याकडे त्या राहत होत्या त्यांच्या भगिनी फातिमा शेख यांना देखील शिकवून त्यांचे staffing सावित्रीबाई यांनी केल होत. या सर्वजणी मिळून शाळेकडे नियंत्रण करणे, अभ्यासक्रम निर्मिती करणे, शाळेत विविध धर्माच्या मुला मुलींना आणणे अशा अनेक गोष्टी करायच्या. पालकांना मुलांना शाळेत घालण्याचे पाठवण्याचे marketing देखील या सगळ्या मिळून करायच्या. अठरा शाळांच्या या संस्थापिका इतक्या प्रबळ होत्या की त्या शाळा अविरत कशा चालू राहतील टिकतील हे सगळं त्या बघायच्या. आजकालच्या संस्थापकांना शिक्षक टिकवणे, त्यांना पगार देणे हे आजही जमत नाही हे जमवून त्या काळी सावित्रीबाई फुले यांनी दाखवून दिले होते.

सर्वात शेवटचे कार्य म्हणजे controling. अजून शाळांची निर्मिती होत असताना जुन्या शाळांमध्ये अजून पट वाढवणे याकडे योग्य नियंत्रण होते. सावित्रीबाई यांनी काशीबाई नावाच्या एका ब्राम्हण स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला होता. त्याला त्यांनी सजग बनवून डॉक्टर बनवला होता. ज्यावेळी पुण्यात प्लेग ची साथ आली होती. तेव्हा पुढे यशवंत डॉक्टर म्हणून लढणार होताच. पण त्याला सोबत असावी म्हणून प्लेग च्या रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी नर्स बनून सावित्रीबाई स्वतःहून पुढे आल्या. त्यांच्या येण्याने त्या प्लेग वाढण्यापासून थोडे फार नियंत्रण झाले. मात्र आमची सावित्रीमाई कालवश झाली.


मग ही सावित्रीबाई तिच्या मध्ये नियंत्रण, आयोजन, कर्मचारी उपलब्धता, नेतृत्वगुण, नियंत्रण आणि महात्मा फुले यांच्या सोबत उभे राहण्याचे Coordination होते मग आहेत ना त्या *सावित्रीबाई फुले : दि मॅनेजमेंट गुरु...*


© डॉ. अलोक पवार

३ जानेवारी २०२४

Thursday, 9 February 2023

रमाई आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून कळलेले प्रेमी बाबासाहेब

रमाई आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून कळलेले प्रेमी बाबासाहेब

डॉ. अलोक पवार

नुकतीच ७ फेब्रुवारी ला रमाई आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारताने साजरी केली. बहुजन संघटन यांच्या वतीने रमाई आंबेडकर ते माई आंबेडकर या विषयावर फेसबुक लाईव्ह ठेवले होते. आणि ते लाईव्ह आमच्या धडाडीच्या अशा आश्लेषा जाधव मॅडम यांच्या कडून दिले गेले. त्यांच्या व्याख्यानाला अनुसरून हा लेख.


एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. आणि तो पुरुष जर युगपुरुष असेल आणि त्यामागची किंवा त्याला युगपुरुष घडविण्यात कोण्या स्त्रीचा योगदान असेल तर आपल्याला रमाई आंबेडकर नाव पुढे येताना दिसते. म्हणजे आपण जेंव्हा जेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध कामगिऱ्या बघतो तेंव्हा आपण इतर कोणाचा विचार देखील करत नाही. मात्र रमाई यांचा विचार तितकाच प्रखर पणे केलाच पाहिजे. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रमा यांचा विवाह बाबासाहेबांसोबत ठरतो तेंव्हा रमा या फक्त नऊ वर्षाच्या होत्या आणि बाबासाहेब नववीत शिकत होते. नववीत शिकणारे बाबासाहेब पुढील वर्षी म्हणजे त्या काळाची मॅट्रिक परीक्षा पास होणार आहे, ही बातमी कळताच रमा यांच्या मनात एक नवचैतन्य निर्माण झाले होते. माझा नवरा हा मला इतका शिकलेला भेटतोय, त्या काळाच्या सामान्य मुलीच्या मनातील एक मोठा मानाचा विषय म्हणायला हरकत नाही. जेंव्हा बाबासाहेब हे उच्च शिक्षित दिसून येतात तेंव्हा काही लोक त्यांची किंवा रमाबाई - बाबासाहेब यांची तुलना सावित्री - ज्योतिबांशी देखील करतात. बाबासाहेब हे तर महात्मा फुले यांना आपले गुरु मानतात मग त्यांनी आपल्या पत्नीला का शिकवले नाही असा एक प्रश्न पुढे येताना दिसतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पत्नीला शिकवलेले दिसतेच. रमाबाई यांनी स्वतः आपल्या हाताने बाबासाहेबांना जो पत्र व्यवहार केला त्यावरून त्यांची सुरवात तर शिकण्यासाठी झालेली तर स्पष्ट दिसून येते मात्र स्वतः रमाबाईंची इच्छा होती की जे बाबासाहेब दिनदलितांचे हित कसे होईल, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा कशी फोडली जाईल या ठिकाणी झटत होते त्यांचे पुढील शिक्षण देखील महत्वाचे वाटते. मग जेंव्हा बाबासाहेब मॅट्रिक होऊन पुढे अजून शिकत आहेत तेंव्हा कौटुंबिक कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना होता कामा नये म्हणून ती सर्व धुरा सांभाळताना रमाबाई दिसतात. 

कोणत्याही प्रकारच्या कौटुंबिक अडचणी ज्या बाबासाहेब यांच्या शिक्षणात बाधा बनू शकतील या सर्व गोष्टी रमाबाई स्वतः दूर करायच्या. एक असाच प्रसंग जो रमाबाई अगदी धीराने सामोरे जाताना दिसतात तो म्हणजे रमेश म्हणजे त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या वेळीचा. बाबासाहेब त्यांच्या शिक्षणासाठी अमेरिकेत होते. आणि त्याच वेळी रमेशचा मृत्यू झाला. रमाबाई इकडे होत्या. मात्र बाबासाहेब यांना ही गोष्ट कळली तर त्यांची धावपळ होईल, कदाचित त्यांच्या चालू शिक्षणात काही व्यत्यय येईल म्हणून रमाबाईंनी साहेबांपर्यंत ही बातमी गेली नाही पाहिजे याची खबरदारी घेतली. व पुढे पत्र व्यवहार करताना त्यांनी स्वतः आपल्या पोटच्या गोळ्याच्या मृत्यू बाबत ही बाब बाबासाहेब यांना सांगितली. त्यांनी बाबासाहेबांना सांगितले की तुमच्या अभ्यासात कोणत्याही प्रकाराचा खंड पडता कामा नये, तुमच्या समाज बांधणी च्या कार्यात खंड पडता कामा नये म्हणून तुम्ही इकडे येऊ नका. रमा या उगाच रमाई म्हणजे या भारताच्या आई उगाच नाही झाल्या. त्यांनी केलेला हा त्याग संपूर्ण भारतभूमी समोर अगदी ज्वलंत दिसतो. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना कौटुंबिक मोहापासून अगदी लांब ठेवलेले अगदी स्पष्ट दिसून येते. जर त्यांनी बाबासाहेब यांना कौटुंबिक मोहात अडकवले असते, मला ही सुखाची अनुभूती पाहिजे असा हट्ट केला असता तर आज मुळात जो युगपुरुष आपल्या समोर आहे तो अजिबातच नसता. कारण त्यांनाही माहिती होते की बाबासाहेब म्हणजे बऱ्याच लोकांचं नेतृत्व करण्यासाठी तयार होणारी व्यक्ती आहे. मग त्यांचा शिक्षणात कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये.

रमाबाई जेंव्हा लग्न करून आल्या तेंव्हा त्यांच्या घरची परिस्थिती ही फार काही थाटाची होती, असे अजिबात नव्हती. स्पष्ट बोलायचे तर सध्याचे मध्यमवर्गीय कुटुंब असते ना तशी देखील नव्हती. त्यांना आत्ताच्या मुली जशा हौसमौज करतात नवऱ्याकडे मला ही साडी घेऊन द्या ती साडी घेऊन द्या अशा चैनीच्या गोष्टी मागण्याची देखील मुभा नव्हती. मुभा नव्हती म्हणण्यापेक्षा त्यांना समोर ज्या परिस्थिती मध्ये आपण जगतो आहोत त्याला त्या अगदी मनापासून स्वीकार करत होत्या. बाबासाहेब आंबेडकरांची तर त्यांना ताकीत होती की भाजीला तेल किती वापरायचे, महिन्याला दोन माचीस बॉक्स वापरले गेले पाहिजे. त्यापेक्षा जास्ती नको. रमाई काटकसरीने कुटुंबाचा गाडा अगदी व्यवस्थितपणे चालवीत होत्या. बाबासाहेब आंबेडकर विदेशात असताना घरात ज्या चार भाकऱ्या व्हायच्या त्यांची वाटणी करताना देखील मुलांमध्ये तीन आणि उरलेली एक भाकरी त्या, त्यांची जाव आणि आत्या या तिघींमध्ये वाटून खाल्या जायच्या. अगदी पोटाला चिमटा काढत होत्या, उद्देश एकच होता बाबासाहेबांचा जो अभ्यास चालू आहे त्याला कुठे खंड पडू देता कामा नये. कारण बाबासाहेबांचा अभ्यास हा बाबासाहेब यांचं भविष्य नव्हतं ते भविष्य होत उभ्या भारताच. ते स्वप्न होत भारतातल्या त्या लोकांचं ज्यांच्यावर आत्तापर्यंत हालअपेष्टांचे ओझे लादले गेले आहे. या मध्ये स्वतःच्या पोटाला चिमटा काढणारी ही रमा किती विचार करते आहे हे स्पष्ट दिसून येते.

रमाई या देखील समाजाची आई होताना प्रखरपणे दिसतात त्या म्हणजे धारवाडच्या एका प्रसंगावरून. त्यांची तब्बेत व्यवस्थित नव्हती. म्हणून हवापालट करण्यासाठी त्या धारवाडला गेल्या होत्या. तेथे जे वसतिगृह होते, तेथे शिकणाऱ्या मुलांना वसतिगृहमध्ये आर्थिक अडचणींच्या मुळे काहीच अन्न शिल्लक नव्हते. रमाबाईंनी अगदी क्षणाचाही विचार न करता आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या देऊन वसतिगृहाच्या प्रमुखांनां अगदी त्वरित विद्यार्थ्यांना लागते तशा धान्याची सोय करायला लावली. स्वतः जिथे राहत नाहीत, ज्या हवा बदलायला धारवाडला आल्या होत्या तेथील वसतिगृहमधील मुलांची काळजी. उपेक्षितांची ही रमाई अगदी प्रखरतेने आपल्या समोर येते.

कालांतराने रमा यांना क्षयाने ग्रासलेले दिसते. रमाबाई यांनी बाबासाहेबांना त्या आजारात अगदी शेवटची इच्छा म्हणून मला पंढरपूरला घेऊन चला असे म्हणाल्या. पंढरपूरला मला विठोबाचे दर्शन घ्यायचे म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी. बाबासाहेबांनी त्यावेळी देखील रमा यांना समजावून सांगितलेले दिसून येते. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनभर जो त्रासाचा अन्यायाचा डोंगर बघितला होता व त्याच डोंगराची चढाई बाबासाहेब करीत होते. बाबासाहेबांनी रमाई यांना असे सांगितले होते की रमाई हि जी इच्छा तू व्यक्त करते आहेस ती तर मी पूर्ण करणार नाही मात्र तुझ्यासाठी एक नवीन पंढरपूर मी साकारतो आहे ज्यामध्ये सर्वांसाठी समानता प्रस्थापित होणार आहे. ज्यावेळी रमाबाई यांना ही सत्याची बाजू पटते तेंव्हा त्या देखील पंढरपूरचा आपला आग्रह टाळतात. 

जी रमा हिने तिच्या आईवडिलांचा शेवट बघितला, जी रमा हिने एकटीनेच अगदी नवऱ्याशिवाय आपल्या पोटच्या चार मुलांचा शेवट बघितला ती रमा ती रमाई अगदी या क्षणात एकटी दिसते. तिच्या शेवटच्या क्षणात ती एकटीच दिसते. एका क्रांतिसूर्याला प्रखर करण्यासाठी ती हरवली होती, ती तिच्या अंताकडे आली होती. तिची ज्योत मावळली वयाच्या अगदी सदोतिसाव्या वर्षी.

बाबासाहेब शिकले, ते भारतातल्या अन्यायग्रस्त लोकांसाठी उभे राहिले. पण त्यांच्या मागे असलेली अगदी खंबीरपणे उभी राहिलेली त्यागमूर्ती रमाई हिचा विसर होता अजिबातच कामा नये.

बाबासाहेब जे लग्न झाल्यावर फक्त मॅट्रिक होणार होते ते आज बॅरिस्टर, पीएचडी आणि भारतातील उच्च शिक्षित झाले होते. त्यामध्ये रमाई यांचा पुरेपूर वाटा होता.

रमाबाई गेल्यावर तब्बल १३ वर्षांनी बाबासाहेब यांच्या आयुष्यात माई आल्या. माईंचे त्यांच्या आयुष्यात येणे हे आज देखील बऱ्याच लोकांच्या मनात सलते. माई या घातकी होत्या, ब्राम्हण समाजातील माई या बाबासाहेबांसाठी विषकन्या होत्या. मात्र हे सर्व बोलताना आपण सत्याचा विचार करणे तेवढेच गरजेचे आहे. आपण जेंव्हा माई योग्य व्यक्ती नाही तेंव्हा आपण माईंच्या वर नाही तर थेट बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या निवडीवर शंका घेतो. त्यांचा निर्णय चुकीचा आहे असा प्रश्न उपस्थित करतो.

बाबासाहेब जेंव्हा कामासाठी आपल्या हितासाठी उभे राहायचे तेंव्हा ते आहेत तसे जागेवर १८ तास सलग उभे रहायचे. या सर्वांचा परिणाम आपण आज जी समानता आपण बघतो आहे, आज आपल्याकडे जी संविधानाची ताकत आहे ते देखील त्याचेच फलित आहे. मात्र या सर्व गोष्टींचा बाबासाहेब आंबेडकर यांच्या शरीरावर एक वाईट परिणाम झाला तो म्हणजे त्यांना मधुमेह झाला. ते नेहमी जेंव्हा काम करायचे तेंव्हा त्यांच्या आजूबाजूला त्यांचे अनुयायी असायचे मात्र खाजगी आयुष्यात त्यांच्याकडे त्यांच्या तब्बेतीकडे पाहणारे कोणीच नव्हते. त्यांच्या मधुमेहाचा इलाज करण्यासाठी ते जेंव्हा डॉक्टर कडे जायचे तेंव्हा तेथे शारदा कबीर या ज्युनिअर डॉक्टर होत्या.  त्या एम.बी.बी.एस. झाल्या होत्या. त्या स्वतःदेखील आंबेडकरांच्या इलाजाकडे लक्ष द्यायच्या. त्यांनी आंबेडकरांच्या तब्बेतीची इतकी काळजी घेतली की रमाई यांच्या नंतर बाबासाहेबांना कोणीतरी आपलेसे वाटायला लागले होते. बाबासाहेबांनी एका पत्राद्वारे शारदा यांना लग्नाचा प्रस्ताव दिला होता. त्यांनी त्यामध्ये 'प्रिय शरू' असा उल्लेख केला होता. शारदा उर्फ सविता यांना ते पत्र मिळताच त्यांनी घरच्यांशी बोलून त्यांना लग्नासाठी हो म्हणले होते. लग्नाच्या वेळी मजेची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आणि शारदा कबीर यांच्यामध्ये तब्बल २८ वर्षाचे अंतर होते. तरीही त्यांच्यामधील प्रेमसंबध कधीच कमी दिसले नाही. 

त्यांच्या प्रेमाचे आणखीन गोष्टी जेंव्हा सविता आंबेडकर उलघडतात तेंव्हा सविता आंबेडकर त्यांच्या लिखाणामध्ये म्हणतात की, डॉ. बाबासाहेब जेंव्हा संसंद भवनात बसायचे तेंव्हा तेंव्हा त्या ठिकाणी सामान्य लोकांना संसदेतील कामकाज बघण्यासाठी एक वेगळे दालन असायचे. आपले काम आपल्या आपल्या पत्नीने देखील बघावे यासाठी आंबेडकर त्यांना गाडी पाठवायचे. येताना ही साडी घालून ये असा आदेशही सावितांना म्हणजे आंबेडकरांच्या शरू साठी असायचा. आणि साविताजींनी तो आदेश पाळला नाही तर आंबेडकरांचा प्रेमपूर्ण अबोला देखील सविताजींना झेलावा लागायचे. बाबासाहेबांचे त्याच्या शरू वर प्रचंड प्रेम होते. तसे साविताजींचे देखील बाबासाहेबांवर भरपूर प्रेम होते. एकदा जेव्हा औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयात आंबेडकरांना बोलावणे आले होते तेंव्हा सविताजींना दिसले की बाबसाहेबांची विजार पूर्णपणे त्यांच्या मलाने भरली होती. त्यांना त्या दुर्गंधीवरून ती गोष्ट जाणवली होती. सविताजींनी त्वरित गाडी पुन्हा हॉटेलवर घेऊन बाबासाहेबांची स्वच्छता करून त्या महाविद्यालयातील कार्यक्रमात हजेरी लावली होती.         

जेंव्हा आपण रमाई आणि सावितामाई यांच्याकडे पाहतो तेंव्हा बाबासाहेब यांच्या आयुष्यातील दोन पर्व आपल्या समोर येतात. एक त्यांच्या शिक्षणाच्या आयुष्यात त्यांना भरभरून साथ देणारी रमाई दिसते आणि दुसरी जेंव्हा  स्वतंत्र भारताच्या संविधानाचे काम आंबेडकर करतात तेंव्हा त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घेणारी त्यांची सविता माई दिसून येते. या दोघींवर आंबेडकरांनी प्रचंड प्रेम केले. 

Wednesday, 25 May 2022

त्यांनतरच्या वेदना

 त्यांनतरच्या वेदना

गुगल वरच्या बातम्या वाचताना महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण विभाग प्रमुख रुपालीताई चाकणकर यांची एक बातमी नजरेस पडली. बातमीचा सारांश असा होता की रुपालीताई यांच्या काकांचे नुकतेच निधन झाले. निधन झाल्यावर काकांना जेंव्हा अग्नी द्यायची वेळ आली, तेंव्हा काकूंचे सौभाग्याचे लेणे म्हणजेच मंगळसूत्र हे तोडण्यासाठी विचारले गेले. काकांच्या मुखामध्ये मंगळसूत्रामधील सोन्याचा मणी ठेवून अंत्यविधी पुढे सरकणार होता. पुढे बांगड्या देखील तोडणे होणार होते. म्हणजे काकूंचे व्हिडीओ सौभाग्य हे काकांशी एकवटलेलं होते आणि काका गेले म्हणजे काकूंच्या असण्या नसण्यानं कोणाला फारसा काही फरक पडणार नव्हता. म्हणजे कोणत्याही भारतीय रितिरिवाजांमध्ये असेच चालत आले आहे. रुपालीताई चाकणकर यांनी यावेळी आवाज उचलला आणि ही संपूर्ण पद्धती मंगळसूत्र न तोडता, बांगड्या न फोडता काकांच्या तोंडात फक्त तुळशीपत्र ठेवून पार पाडायला लावली अंत्य विधी संपन्न झाला देखील.



कळायला लागल्यापासून पहिल्यांदा मी माझ्या मामाच्या मैतीला गेलो होतो. संपूर्ण रडारड. आरडा - ओरडा, काळजाला भेद देणारे वातावरण होते. त्याच ठिकाणी काही वेळात माझी एक मावशी व काही स्त्रिया या अगदी मामीच्या जवळ बसलेल्या मी पाहिल्या. या सर्व आधीच विधवा होत्या. मामीला धीर देण्याचे काम जणू यांच्यावर सोपावले गेले होते. बर या धीर देण्याचा शेवटचा भाग म्हणजे मामीचे मंगळसूत्र तोडणे, तिच्या बांगड्या फोडून या सर्व सौभाग्याच्या गोष्टी मामाच्या चितेवर सोपावणे. 

गावाकडे शक्यतो बायका स्मशानात जात नाहीत म्हणून या सर्व गोष्टी घरीच केल्या जातात जिथे ती स्त्री लग्न करून आली. जिथे तीने लग्न करून माप ओलांडले. जिथे स्त्रीने तिचा नवीन संसार थाटला जिथे तीने सासूबरोबर स्वयंपाकघरात बऱ्याच नवीन पदार्थांना आकार दिला. जी सासूसोबत अगदी चार घरी दाग-दागिने घालून मिरवायची, जिने स्वतःला मूल झाल्यावर त्यांचे बारसे, वाढदिवस यात अगदी दागिने घालून मिरवलं या सगळ्या गोष्टी काय तिला तर अगदी कुठे बाहेर जायचे असेल तर ती तासन तास आरश्यासमोर बसायची, अगदी ब्युटी पार्लर मध्ये पण जायची. या सगळ्या गोष्टी जरी एकीकडे सौभाग्याचे लेण असल तरीही दुसरीकडे त्या स्त्रीच्या वैयक्तिक तिच्यासाठीच्या पण असायच्याच ना. मग तिचा नवरा गेला की तिचे सौंदर्य संपते का? हा प्रश्न समोर थांबतो.

विधवांना नवऱ्याच्या चितेत ढकलून देणे थांबले, विधवा केशवपन थांबले. मात्र विधवांची ही त्यांच्या सौंदर्यापासूनची अडवणूक ही त्यांना खरंच मनापासून वेदना देणारी आहे.

त्यातूनही आजकालच्या जगामध्ये एखादी विधवा स्त्री नटली तर तिला जग बोलते, तिचा शृंगार नक्की कोणासाठी आहे यावर प्रश्न काढले जाऊ शकतात. पण तो तिच्यासाठीच असू शकतो हा नवीन विचार रुपालीताई चाकणकर यांनी बांधून दिला आहे. प्रथा बदलू शकते त्यात नवीन विचारांची गरज आहे हे तितकेच खरे आहे. निदान व्यक्ती म्हणून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, व त्याचे एक वेगळे आयुष्यं आहे त्या वेगळ्या आयुष्यात साथीदार कालविवश झाला तर पुढे जाण्यासाठी एक वेगळा लढा द्यावा लागतो. त्यातले जगणे पैलवावे लागते, त्यामुळे निदान या ज्या जुन्या चालिरिती आहेत, त्यांना थोड बदलूयात.

Wednesday, 9 March 2022

किनाऱ्यावरच्या महिला उद्योजिका 

अलोक अर्जुन अलका पवार 

काही दिवसांपूर्वी रत्नागिरी मधील दापोली तालुक्यातील हर्णे बंदरावर जाणे झाले. आता बंदर किंवा समुद्रकिनारा म्हणल तर काही ठराविक गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात. एक तर पर्यटन आणि दुसरे म्हणजे मासेमारी. आपल्याला शक्यतो बऱ्याच व्यवसायांमध्ये पुरुष मंडळी पुढाकाराने पुढे दिसतात. मासेमारी हा व्यवसाय पण पुरुषांचे वर्चस्व असलेला एक प्रमुख व्यवसाय. हर्णे बंदरावर देखील प्रामुख्याने समुद्रात जाऊन मासे पकडून आणायचे आणि त्यापासून आपले उत्पन्न कमवायचे हा येथील लोकांचा आणि प्रामुख्याने पुरुषांचा व्यवसाय. मात्र मला या बंदरावर काहीसे वेगळे चित्र दिसले जे महिलांचे महिला उद्योजिका होण्यास भाग पाडते.   




लीला मिटकरी : तू माझी सावित्री मी तुझा यशवंत

लीला मिटकरी : तू माझी सावित्री मी तुझा यशवंत 

पवार अलोक अर्जुन अलका 

म्हणतात ना प्रभू तुझी लीला काहीशी वेगळीच. आणि तुझी लीला अनुभवणारा देखील तुला समजतो. ही लीला कळते ती म्हणजे साक्षात आईच्या रूपात. आणि मग ती आई नेहमी प्रेम करत असते. आमच्या कडे पण एक extra आई आहे. घरी नाही कामाच्या ठिकाणी. आमच्या श्री स्वराज एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा लीला वसंत मिटकरी.



लीला मिटकरी, मूळच्या बीड जिल्ह्यातल्या. आता हे मूळच्या बीड च्या हे सांगणे अतिशय महत्वाचे कारण मराठवड्यातला बीड जिल्हा हा फक्त आणि फक्त दुष्काळासाठी प्रसिद्ध आहे. पाऊस या भागावर तसा नाराजच. कदाचित या दुष्काळी भागामुळे आम्ही आमचे अहोभाग्य मानतो की आम्हाला अजून एक आई भेटली. हिवरशिंगा, तालुका जिल्हा बीड मधील लीला चिपाडे, जेमतेम पाचवी शिकलेली. साधारण त्याच वयात पुढे लग्न झाले आणि ती लीला वसंत मिटकरी बनली. लग्न झाले आणि ६० किलोमीटर बैलगाडीवरून वरात घेऊन वसंतरावांच्या घरी म्हणजे लोणीघाट, ता. जि. बीड येथे आल्या. सुन म्हणून लग्न करून आल्यावर त्या घरची मोठी सुन. घर हे अगदी छोटे, पण माणसांनी ते भरगच्च् असे होते. म्हणजे नवरा, चार दीर, दोन नंदा, सासू सासरे. एकूणच सासरच्या बागेत कळ्या खूप होत्या. आईला प्रत्येक कळी उमलावयाची होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मायेच्या पाण्याला कधीच कमी नाही होऊ दिले. मोठी सून म्हणून प्रचंड जवाबदा-या पार पाडाव्या लागतात. सर्वांचा मान राखावा लागतो, रोज स्वयंपाक घरात काम करावे लागते. सून म्हणून लग्न करून आले आहे तर सासूला स्वयंपाक घरातून आराम द्यावा लागतो. सासूला यांना काय आवडते त्यांना काय आवडते, याची विचारणा करून संसार फुलवावा लागतो. हे सगळ आपल्या अगदी शांत, मनमिळावू स्वभावाने आईंनी अगदी व्यवस्थित करून दाखवले. वडिलांच्या घरी शेती असूनही कधी शेतात काम केले नाही, मात्र लग्नानंतर पती हाच परमेश्वर हे माणून तो जे सांगेल, त्याच्या सुखदुःखात साथ द्यायची म्हणून शेतातली अगदी सर्वच कामे केली.अडीच वर्षे बीड च्या शेतात काम करून त्यानंतर गाडी पुण्याला थांबली. वसंतराव पुण्याच्या गणेशपेठेतील मुरलीवाला स्टोअर मध्यें काम करत होते. पगार हा जेमतेम होता. त्या मुळे पगार येईल आणि घर दिमाखात  चालेल असे आजिबातच काही नव्हते. घर म्हणजे दहा बाय दहा चा महाल होता. तिथेच गॅस, तिथेचं सिलेंडर, तिथेचं अंथरुण तिथेचं पांगरून. आणि हो तिथेचं त्या दहा बाय दहा मध्यें राहायला नवरा आणि सोबत दोन दीर देखील. या सर्वांना अगदी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळण्याचे काम आईंनी अगदी चोखपणे केले. मात्र हे सर्व करताना पैशाचे सोंग आणता अजिबातच नव्हते येत. त्यामुळे घरी स्वत:देखील काम केले पाहिजे, या उमेदीने आईने रक्षाबंधन आले की, घरीच राखी तयार करण्याचे काम सुरु केले. घराला पैसा कसा जोडला जाईल यातून फक्त रक्षाबंधनच नाही तर दिवाळीच्या वेळी फटाक्यांची विक्री देखील कशी करता येईल हे देखील त्यांनी बघितले. हो अगदी मोठ्या दुकानांमधून खोकी घेऊन त्यांना जळणासाठी इंधन म्हणून लोकांना विकण्याचे काम देखील काकूंनी केले. पंच्याहत्तर पैश्यामध्ये विकत घेऊन पुढे दीड रुपयांना विकून अवघ्या पंच्याहत्तर पैशाचा तो एक आधार होता. आपल्याला या दहा बाय दहा च्या घरातून बाहेर पडायचे आहे. यासाठी या नवरा बायकोंनी मिळून गुलटेकडी येथे अवघ्या चार हजार रुपयांमध्ये घर घेतले. हे चार हजार रुपये सध्या अवघे वाटतील पण त्यावेळी त्याची किंमत किती होती, आपल्या किती आशा आकांक्षावर दगडे मारून ते घर झाले होते हे फक्त त्यांनाच माहित.

पुढचा कालावधी हा आईच्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. तिने तिच्यामधील नाविन्यपूर्ण कलागुणांना जणू वाव दिला होता. आई सुरत ला गेली होती. तेथून भरपूर साड्या विकत घेतल्या होत्या. सुरतला साड्या खूप छानही भेटतात आणि जरा स्वस्त देखील भेटतात. म्हणून स्वारी थेट गुजरातमधील सुरत मध्ये होती. भरपूर साड्या खरेदी केल्या. पण यातली एकही साडी स्वत:साठी नव्हती त्या साड्या होत्या 'लीला साडी सेंटर' मधल्या. लीला साडी सेंटर हे कोणतेही दुकान नव्हते. आपल्या घरीच पण अगदी लायसन्स काढून थाटलेले दुकान होते. आजूबाजूच्यांना, नातेवाईकांना, ओळखीच्यांना साड्या दाखवायच्या आणि त्यांना साड्या घेण्यासाठी प्रवृत्त करायचे. येथूनच आमची माउली आईसोबत मार्केटिंग स्कील शिकली होती. मराठीमध्ये एक म्हण आहे की, बोलणाऱ्याची  मातीही विकली जाते न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही. आमच्या आई छानपणे बोलायला शिकली. मग अगदी रविवार पेठेत जाऊन सुद्धा ती साड्या आणून दुकानात ती मांडू लागली.

एका बाजूला परिवार वाढत होता. गणेशपेठेतून गुलटेकडी, तिकडून महर्षीनगर, असा प्रवास सुरु होता. घर मोठ होत होत. म्हणजे घरातील लोकांची संख्या वाढत होती. भाऊंनी त्याकाळी स्वतःचे काहीतरी करायचे म्हणून औरंगाबादच्या गोपी साबणाचे वितरण पुण्यात सुरु केले होते. गोपी साबणाची कंपनी औरंगाबाद मधील थोरातांची. पुण्यातल्या वेगवेगळ्या भागात साबण वितरण करण्यासाठी माणसे नेमायची होती. त्याकाळी कुठे एमबीए झालेले कामगार भेटायचे. जे त्यांचे मार्केटिंग स्कील दाखवू शकतील आणि बसल्या बसल्या आपला माल विक्री होऊ शकतो. मात्र जे कामगार भेटतील तेही अगदी महत्वाचे होते. त्यांच्या जीवावर आपला धंदा मोठा होणार होता. त्यामुळे त्यांना देखील सांभाळणे फार महत्वाचे होते. त्यात भाऊंचा स्वभाव तापट. त्यांच्या तापलेल्या तापट स्वभावाच्या तव्यावर वेळोवेळी पाणी टाकून गार करणे हे देखील तितकेच महत्वाचे असायचे. हे काम केले आमच्या आईसाहेबांनी. कामावरची माणसे कशी जपायची हे आमच्या एच आर मनेजर म्हणजे आई घरी बसून साध्य करून दाखवायच्या. त्यांच्यासाठी खिचडी, बीडचे प्रसिद्ध धपाटे करून पाठवायच्या. मग आईच्या हातचे खाऊन बॉस आणि कामगार दोघेही गार. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, वाघाच्या तोंडाला रक्त लागल्यावर त्याला मांस पाहिजे असते तसे मला देखील आईने हे धपाटे खाऊ घातले आहे, अतुलच्या डब्यात खास पवार सरांना हे धपाटे असे वेगळे माझ्यासाठी यायचे. अजूनही येतात. हे माझे नशीब म्हणूयात.

त्याच काळी 'क्योंकी सास भी कभी बहु थी' ही मालिका प्रसिद्ध होती. त्यामधील तुलसी सर्वांना माहिती असेल. म्हणजे स्मुती इराणी. तिने तिचा पैसा वाढवा यासाठी एका साबणाची कंपनी टाकली होती. पुण्यामध्ये वितरण चांगले व्हावे यासाठी तिने भाऊंना हेरलं होत. भाऊसोबत काम करताना भाऊनी होम मिनिस्टर म्हणजे आईंशी देखील ओळख करून दिली होती. तुम्हाला सर्वांना सांगावयास मला खूप छान वाटते जेंव्हा यांची भेट झाली तेंव्हा या दोघीजणी यांचा शिक्षणक्षेत्र याच्याशी काहीच संबंध नव्हता. मात्र पुढे एका बाजूला स्मुती इराणी या भारताच्या भाजपा आघाडी सरकार कडून मानव संसाधन मंत्री झाल्या, ज्यामध्ये त्यांच्याकडे विद्यापीठ, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अशी विविध जवाबदारी होती. आणि दुसऱ्या बाजूला आज आमची आई ही देखील श्री स्वराज एज्युकेशन सोसायटी ची पहिला महिला अध्यक्ष बनली.

तुम्हाला सर्वांना हे सर्वांना सांगणे माझे कर्तव्य आहे की, सध्याच्या राहत्या घरात जाण्याच्या आधी ही आपल्या महाविद्यालयाची वास्तू आहे ना, ती बांधली गेली होती, या सर्व भावंडांना एकत्र घेऊन राहण्यासाठी. या ठिकाणी काही मंडळी राहिली पण मात्र मिटकरी परिवार या वास्तूमध्ये राहण्याचा उपभोग घेण्यासाठी कधी आलाच नाही. पुढे आपले महाविद्यालय होण्याचा प्रस्ताव येथे आला. फाटक्यातून आपला संसार उभा करणारी एखादी स्त्री सहज आज आपल्या नवऱ्याला म्हणते की, 'काय करायचे आहे हे सर्व. भाड्याने द्या पैसा येउद्या". मात्र आईने हे कधीच नाही केले. महाविद्यालयात थाटण्याच्या निर्णयात त्या अगदीच भाऊनसोबत त्यांच्या सकारात्मक विचारांना माप देणाऱ्या होत्या. श्री स्वराज एज्युकेशन सोसायटी झाली, त्यामध्ये अगदी भाऊ अध्यक्ष झाले आणि आमची आई सदस्य देखील झाली. या वास्तूमध्ये फक्त शिक्षणाचे दरवाजे नसणार तर माझ्यासारख्या चार चौघांना आपली ओळख देखील भेटणार. आज मुल मला सर सर करतात. अगदी मातृदिनाला त्या दिनाच्या शुभेच्छा देखील देतात. हे सगळे याच वास्तूमुळे. आहे कि नाही मग हि सावित्रीमाई.

फक्त इतकेच नाही तर आळंदीला वसंतराव भक्तनिवास आहे. तुमच्यातल्या काही जणांना माहिती देखील नसेल. बीडमधील गरीब आणि गरुजू मुलांना शिक्षनासोबतीने अध्यात्मिक ज्ञान प्राप्ती व्हावी यासाठी भाऊ आणि आईंनी थाटलेले एक दालन. तीन मजली या वास्तूमध्ये बरीच मुल शाळा शिकतात, त्याच सोबत ज्ञानोबा - तुकाराम यांचे भजन गातात. त्याचसोबत तबला पेटी टाळ मृदुंग हे देखील वाजवितात. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत कपडे दरवर्षी द्यायला हि माऊलीच जाते. ज्यावेळी वारी येते तेंव्हा लेकरांसाठी आणि आलेल्या सर्व भक्तांसाठी सध्याची आपली पद वाढली आहे याचा कोणताही अहंकार न ठेवता तिला स्वतःला मी मोठ्या कणकेच्या गोळ्याच्या चपात्या लाटताना मी बघितले आहे. तिला मी घरी जेंव्हा वारी येते तेंव्हा कंबर कसून काम करताना बघितले आहे. कधीच कोणता अहंकार नाही. काही नाही.

आई थायलंड, मलेशिया, सिंगापूरला जाऊन आली. नवीन शहरात नाही तर नवीन देशात जाऊन तिथला पोशाख याबद्दल सर्वांनाच आदर असतो. पण आपल्या मातृभूमीचा आदर सोडायचा नाही म्हणून त्याठिकाणी देखील भारतीय स्त्रियांची शान दाखवावी असे मनाशी ठासून त्यांनी तेथील पर्यटन स्थळे बघताना फक्त आणि फक्त साडीच परिधान केली.

२०१९ मध्ये भाऊ आम्हाला सोडून गेले. मिटकरी परिवार आणि आमच्यावर अगदी आभाळ कोसळावे अशी घटना होती ती. डोळ्यात अश्रू होते सर्वांच्या. आता आमच्या अडचणी कोण समजावून घेणार. भाऊंनी नेहमीच आमची बाजू उचलून धरली. आता कसे होणार. ऑफिशियल भाऊ गेल्यावर आमच्या संस्थेला अध्यक्ष पाहिजे होता. भाऊंच्या नंतर ते अध्यक्षपद त्यांच्या पत्नीचे म्हणजे लीला मिटकरी यांच्याकडे असावे असा आग्रह झाल्यावर लीला मिटकरी म्हणजेच आमच्या आई श्री स्वराज एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्या वाहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. डोळ्यात अश्रू, शिक्षण देखील अगदीच जेम तेम झालेल्या काकू, हे सर्व पार पाडतील का, असे वाटले. बीडच्या अगदी खेडेगावातून आपला संसार चालवला. नवऱ्याने ज्या ऐटीने महाविद्यालय सुरु केले, त्या दिमाखाने स्वराज पुढे राहील का, यासाठी काकूंना उभे राहायचे होते. आपला संसार चालविण्यासाठी त्यांनी भाऊंना क्षणोक्षणी मदत केली. आता भाऊ नाहीत. मात्र त्यांनी पुण्यामध्ये सुरु केलेल्या गोपी साबणाच्या वितरणासाठी दिमाखात उभे राहिलेले नीता एजन्सीज देखील पुढे चालवायचे. बाकी काही नाही मात्र या सर्व ठिकाणी आपल्याला कर्मचारी वर्ग आहे, त्यांना सांभाळावे लागते, त्यांना व्यवस्थित सांभाळले तर ते त्यांचे काम चोख पणे करतात. आई त्यांना घरी आले तर चहा नाश्ता अगदी जेवण करून जा असे हक्काने सांगत. त्यामुळे वाणिज्य क्षेत्र म्हणून आमच्याकडे त्यांचे जिवंत उदाहरण असते. स्त्री उद्योजिका म्हणून देखील त्यांच्याकडे बघायला काही हरकत नाही. NAAC चा पहिला दिवस होता. मी दुसऱ्या कॉलेज मध्ये 'माझ्या सादरीकरणात' मी काय टाकू हे विचारले. तेंव्हा त्यांनी तुमच्या महाविद्यालयाची, महाविद्यालयातील विभागांची ताकत काय आहे ते ठासून सांगा असे सांगितले. शक्यतो ताकदीचे अन्य मुद्दे होते. पण म्हणालो काहीतरी हटके असावे म्हणून शोधता शोधता आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कॅम्पचे फोटो बघत होतो. मी पहिलाच कॅम्प होता. त्यामध्ये मुलांना त्यांच्या घरापासून दूर नेतोय. त्यांना नीट सांभाळतो आहे की नाही हे पाहण्यासाठी आई आल्या होत्या. त्याच्यासोबत पटकन एक फोटो काढला होता. तो फोटो बघितला आणि एकदम कळल की फक्त आमचे महाविद्यालयच नाही तर महाविद्यालयातील प्रत्येक विभागाची ताकद म्हणून मी लीला मिटकरी यांचे नाव सांगू शकतो. आमच्या सोबत NAAC च्या दोन दिवशी त्या अगदी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत होत्या. काही कमी पडते का हे बघायला त्या अगदी कॉमर्स विभागातच बसून होत्या. दोन दिवस त्या शांत होत्या. मात्र त्यांचे असणे आमच्यासाठी भरपूर काही होत्या. मी माझ्या सादरीकरणामध्ये त्यांची ओळख करून दिली. आणि त्याच दिवशी संध्याकाळी आमच्या मुलांनी याच NAAC च्या मेम्बर्स साठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मी हट्टाने या कार्यक्रमात गणेश पूजन किंवा सरस्वती पूजन करणे आपल्याला टाळायचे आहे हे सांगितले. आपल्यासाठी आपल्या पुण्यासाठी, आपल्या महाराष्ट्राचे आणि संपूर्णच भारताचे दैवत म्हणजे शिक्षणाची गंगोत्री उभे करणारे दाम्पत्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. ते दोघेही एका धर्माला एका जाती पंथाला अनुसरून चालणारे नव्हते. त्यांचे आयुष्य म्हणजेच एक जिवंत देवपण होते. त्यामुळे महाविद्यालयातल्या तृतीय वर्षातील माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना घेऊन मी त्या दोघांच्या आयुष्यावरील नाट्यमयी नृत्य सादर केले. स्त्री शिक्षण घेण्यासाठी किती खस्त्या आधी खाल्ल्या आहेत हे दाखवून दिले. NAAC peer टीम अगदी जिवंत देखावा घडतो आहे असे कार्यक्रम बघत होते. दुसऱ्या दिवशी  NAACची सांगता झाली. त्यामध्ये त्या टीम मेंबर पैकी एक म्हणजे नाझीर चिराग सरांनी माझ्या कडे आणि आईंकडे बघून "लीला मॅडम, सच बताऊ, आप इस कॉलेज की सावित्रीबाई हो." जम्मू काश्मीर च्या चिराग सरांना आमच्या लीला आई भावल्याच नाही त्यांनी दोन दिवसात वास्तव ओळ्खल. जी स्त्री शिकली नाही ती गावातून शहरात येऊन मुलांसाठी कॉलेज उभारते. त्या कॉलेज चे NAAC व्हावे म्हणून दोनी दिवस शिक्षक असो, विद्यार्थी असो त्यांना आधारवड म्हणून कॉलेज मध्ये थांबल्या. आई खरेच तू आमची सावित्री आहेस. आई खरच तू आमच्यासाठी मायेचा सागर आहेस, तुझ्याशिवाय आम्ही घडणे शक्य नव्हतेच.     

तू माझी सावित्री मी तुझा यशवंत...

Sunday, 9 January 2022

फातिमा शेख : पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्ष

फातिमा शेख : पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका

अलोक पवार

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रिया आणि दलित यांना शिकवण्याचे व्रत हाती घेतले. स्त्री शिक्षण हे चुकीचे आहे, त्यांना कशाला शिक्षण, त्यांना चूल आणि मूल या दोन गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या तर बस. मात्र आपले काम चोख पणे बजावणारे फुले दांपत्य मागे हटणारे नव्हते. त्यांनी जगाचे काय महात्मा फुले यांच्या वडिलांनी ओरडून देखील त्यांचे ऐकले नाही. महात्मा फुले यांचे वडील गोविंदराव फुले यांचे बऱ्याच कर्मठ लोकांनी कान भरले व त्याचा परिणाम त्यांनी महात्मा फुले यांना सपत्नीक घरातुन बाहेर काढले.

बेघर झालेल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना आपले कार्य थांबवायचे नव्हते. महात्मा फुले यांच्या परिचयाचे उस्मान शेख यांनी त्यांना आपल्या घरात राहायला जागा दिली. उस्मान यांची बहीण म्हणजे फातिमा शेख. फुल्यांसाठी ही बहीण भावांची जोडी म्हणजे फक्त राहण्यासाठी जागा इतकी सोय नाही तर शिक्षणाचे कार्य वाढविण्यासाठी देखील त्यांचे घर कामी आले.

फातिमा शेख यांनी देखील हे कार्य समजून घेऊन त्यांनी स्वत:ने या कार्यात उडी मारली. त्यांनी देखील सावित्रीबाई यांच्या सारखे शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. त्या भारतातील सर्व प्रथम अधिनिक शिक्षण देणाऱ्या पाहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका ठरल्या. फातिमा शेख या फक्त विद्यार्थ्यांना शिकवत नव्हत्या तर त्या तर त्यांनी पुढे जाऊन शिक्षणामध्ये आपण आणखी भरीव प्रगती काय करू शकतो याचा विचार केला. यासाठी त्यांनी महात्मा फुले यांच्या मदतीने त्यांच्याच घरात १८४८ साली स्वदेशी पुस्तकांचे पुस्तकालय स्थापन केले. वंचित विद्यार्थी, स्त्रिया प्रामुख्याने अगदी मुस्लिम स्त्रियांना यात सहभागी केले. त्यांना पुस्तके वाचण्यास प्रवृत्त केले. त्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सध्याच्या भाषेत बोलायचे झाले तर सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. 

मात्र त्या काळचे शैक्षणिक मार्केटिंग इतके सोपे नव्हते. त्यांना देखील काही कर्मठ लोकांकडून विरोध झाला. मात्र त्या देखील मागे हटल्या नाहीत. आणि शिक्षण दानाचे काम अविरत चालू ठेवले.

आज याच फातिमा शेख यांची १९१ वी जयंती. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 

जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

  जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक © डॉ. अलोक पवार  M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थाप...