Monday, 31 May 2021

लढवय्या पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर

लढवय्या पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर 

प्रा. अलोक पवार 

मल्हारराव होळकर पुण्याला निघाले होते. बाजीराव पेशव्याच्या सैन्यातील एक महत्वाचे सरदार म्हणजे मल्हारराव होळकर. माळवा प्रातांचे वतन त्यांच्याकडे होते. पुण्याला जात असताना अहमदनगरला जामखेड तालुक्यातील चौंडी गावास ते थांबले. एका महादेवाच्या मंदिरात ते दर्शनास गेले असता तिथे त्यांची नजर एका बालिकेवर पडली. आठ वर्षाची होती ती बालिका. नाव विचारल्यावर अगदी नजर उंचावून 'आहिल्या' असे उत्तर तिने दिले. आपल्या समोर निर्भीडपणे एक फक्त ८ वर्षाची बालिका अशी खंबीर पणे देवाची पूजा करते आपल्या प्रश्नांची उत्तरे देते आहे हे मल्हारराव यांना अतिशय मनाला भावले. त्यांनी त्वरित तिच्या आई वडिलांना भेटून आपला मुलगा खंडेराव याच्या लग्नासाठी बोलणी केली. आणि माळव्याच्या सरदाराची त्यांच्या मुलासाठी मागणी आल्याने आहील्याचे आई वडील नाही म्हणू शकले नाहीत आणि त्या दोघांचे लग्न झाले. 

आहिल्याबाई यांचा जन्म मुळचा अहमदनगरच्या जामखेड मधील चौंडी मधील. ३१ मे १७२५ मध्ये त्यांचा जन्म झाला. माणकोजी शिंदे यांच्या त्या कन्या. त्या काळी स्त्रियांना शिकविण्याची प्रथा नव्हती मात्र माणकोजी शिंदे यांना जेवढे जमेल तेवढे त्यांनी आपल्या मुलीला शिकवले. स्त्रीशिक्षणाला विरोध असतानाही माणकोजी शिंदे यांनी या गोष्टीच्या विरोधात जाऊन शिंदे यांनी मुलीला लिहायला आणि वाचायला शिकवले. 



आहिल्याबाई वयाच्या फक्त २९ व्या वर्षी विधवा झाल्या. त्यांचे पती खंडेराव १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत मृत्युमुखी पडले. त्या काळी नवरा गेला की सती जाण्याची प्रथा होती. मात्र सासरे मल्हारराव होळकर यांनी ही प्रथा न जुमानता आहिल्याबाई यांना सती जाण्यापासून थांबवले. मल्हारराव हे या सर्व गोष्टींमध्ये स्वतःला दोषी मानले मल्हारराव आणि त्यांची पत्नी गौतमीबाई यांचा खंडेराव हा एकमेव आणि प्रथम पुत्र. पुत्र झाल्याने अति लाडाने किंवा संगतीने खंडेराव थोडे बिघडत चालले होते, त्यांना अगदी दारूचे आणि अफूचे व्यसन लागले. त्या व्यसनाने खंडेरावाचा घात केला. अचानक कुम्हेरच्या लढाईत शत्रूची गोळी आली आणि खंडेरावाच्या शरीरात घुसून खंडेराव धारातीर्थी पडले. अहिल्याबाई पतीच्या शोकाने सती जायला निघाल्या खऱ्या मात्र सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांना सांगितले, आधीच मुलगा गेला म्हणून आमच्यावर आभाळ कोसळले आम्हाला कोण सांभाळणार, तुझा लेक मालेराव देखील लहान आहे त्याला कोण मोठा करणार त्याला अनाथ करणार का? या सासऱ्यांच्या शब्दाला जुमानून आहिल्याबाई सती जायच्या थांबल्या.       

मल्हाररावांनी सर्व जबाबदारी आहिल्याबाईंच्या खाद्यांवर टाकली होती. आहिल्यादेवी दोन्ही म्हणजे घरचा आणि राज्याच्या कारभार अगदी व्यवस्थितपणे सांभाळत होत्या. मल्हारराव यांच्यासोबत युद्धातदेखील त्या सहभागी व्हायच्या. त्यामुळे त्यांना युद्धाचे, रयतेचे ज्ञान अधिकच यायचे. माणसांची पारख कशी करायची कोण कसे आहे, हे आहिल्याबाई अगदी व्यवस्थित शिकल्या. आहिल्याबाई यांना दोन मुले, एक मुलगा मालेराव आणि मुलगी मुक्ताबाई. मल्हारराव १७६५ साली आजारी पडून ग्वालेरजवळच्या अमलपूर गावी मृत्युमुखी पडले. नवरा गेला त्यांनतर मोठा आधार असलेला सासरा देखील गेला ही आहिल्याबाईंच्यावर मोठी संकटांची रांग असल्यासारखे होते. मात्र सासऱ्यांनी कोणत्याही संकटाला घाबरून राहायचे नाही अशी शिकवण आहिल्याबाई यांना दिली होती. मल्हाररावांच्या मृत्युनंतर आहिल्याबाई यांच्या मुलाला सुभेदारी द्यायचे ठरले. जून १७६६ मध्ये तसे पेशव्यांकडून तसे पत्र देखील आले. मालेराव २१ वर्षांचा होता. मात्र जहागिरी कशी सांभाळायची हे त्याला अजिबात माहिती नव्हते. त्याला प्राण्याशी खेळायला आवडायचे. वडील खंडेराव यांच्यासारखाच तोही लहरी आणि व्यसनी बनला होता. मालेराव सुभेदार होता तरीही सर्व कारभार आहिल्याबाई स्वतः सांभाळत होत्या. पेशव्यांना देखील या परिस्थितीची जाणीव झाली त्यांनी आहिल्याबाई यांना पत्र लिहून कळविले, हिंदुस्थानच्या कामकाजासाठी आम्ही मालेराव यांच्याकडून काम करून घेऊ मात्र तुम्ही पूर्वीप्रमाणेच आपल्या मुलुखाची जवाबदारी पाहून घ्या. या वरून पेशव्यांच्या डोळ्यात अहिल्याबाई यांचे कर्तुत्व कसे होते हे स्पष्ट होते. मालेराव थोडा वेडसर देखील होता. त्यातच १७ मार्च १९६७ मध्ये तोही मरण पावला. आहिल्याबाई यांच्यासमोर एक एक करून दुखाचा डोंगर उभा राहत होता. 

पुढे आहिल्याबाई यांची मुलगी सती गेली. मात्र तरीही आहिल्याबाई यांनी आपले नेतृत्व सोडले नाही.त्यांनी त्यांच्या अगदी स्त्रीधानातील पैशातून देवळे बांधणे, दानधर्म करणे, धर्मशाळा किंवा नद्यांना घाट बांधणे, अन्नछत्र चालवणे, विहिरी, तलाव बांधणे, रस्त्याच्या दुतर्फा झादे लावणे अशी बरीच कामे पार पाडली. 

आहिल्याबाई होळकर यांचे संपूर्ण चरित्र पाहिल्यास आणि त्या काळाच्या स्त्रियांची व्यथा बघितल्यास त्या कधीच डगमगल्या नाहीत. त्या अगदी पुढारलेल्या होत्या. त्यांनी परिस्थितीप्रमाणे सर्व अगदी खंबीरपणे सांभाळले होते. त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांना त्यांच्यावर त्यांच्या कर्तुत्वावर अगदी प्रामाणिक विश्वास होता. त्यामुळेच कदाचित त्या घडल्या. सासरे आणि सून यांनी केलेल्या आणि जिंकलेल्या लढाईचे कदाचित हेच उदाहरण असू शकते. खुद्द पेशव्यांनी सुद्धा या घटनेला दाद दिली. होती. 

आज आहिल्याबाई होळकर यांची जयंती. त्यांना माझा मानाचा मुजरा. 


Friday, 7 May 2021

आमची अलकी : मातृदिना निमित्त

 आमची अलकी  : मातृदिनानिमित्त 


"हे बघ अलका, दोन मुली झाल्यात मुलगा झाला नाही तर माझ्या अर्जुन चे दुसरे लग्न लावून देईल", हे प्रेमळ (अय्या खरंच प्रेमळ का म्हणतोय हे नंतर सांगतो) शब्द होते आमच्या स्वर्गीय आजीबाई यशोदा पवार यांचे. पप्पा तसे एकदम रुबाबदार, गोरे घारे असण्यामुळे कोणतीही बाई कदाचित पुनर्विवाह करू शकते ही दाट भीती मम्मी म्हणजे आमच्या अलकाच्या मनात दाट शक्यता घर करून बसली होती. आपला पती हाच परमेश्वर असतो, त्याच्या घरावर, घरातल्या माणसांवर अगदी मनापासून प्रेम करायचे असते. अशी पूर्ण तंबी लग्न होताना अलका च्या माहेरच्यांनी तिला दिली होती. म्हणूनच सारस बागेतल्या गणपती मंदिरात अर्जुनरावांना या अलकी ने एक वचन दिले होते. "मी मोठा भाऊ आहे, माझ्या मागे माझे पाच भाऊ बहीण आहेत, तू सर्वांच करशील ना? माझे घर सांभाळशील ना?", आणि म्हणतात हे लैला-मजनू, प्यार मे डूबे होते हे, लडकी ने भी प्यार के खातीर, 'हा' करदी. घर खरच मोठे होते, आकाराने नव्हे माणसांनी. सासू - सासरे, नवरा, तीन लहान दिर, दोन नणंदा, आणि एक आजीसासू सुद्धा. आकार म्हणावा तर अगदी दहा बाय दहा च्या दोन खोल्या, पत्राच्या. त्याही अगदी पूरग्रस्तांना महानगर पालिकेच्या वतीने मिळालेल्या. फक्त आपला नवरा असा हँडसम आहे हे बघून या मोठ्या घरात आपले शिक्षण, नोकरी अर्धवट सोडून मुंबईचे भन्नाट आयुष्य सोडून ही अलका अगदीच चाळींच्या घरात आली होती. 

ती मस्त या सर्व गोष्टींची मज्जा घेत होती. म्हणजे अगदी भाज्यांना कशी फोडणी द्यायची हे व्यवस्थित माहिती नसलेली ही अलका इतक्या माणसांचा स्वयंपाक करायचा, सार्वजनिक नळावर पाणी भरायला जायचे या सर्व गोष्टी अगदी आनंदाने स्वीकारू लागली होती. पहिली मुलगी झाल्यावर साधारण आनंद होतो तसा झाला होता सर्वांना, तिलाही झाला होता, मात्र पुढे आली तीच ती आजीची धमकी. मात्र यावेळी देखील मुलगी झाली. अलका ने "अब तेरा क्या होगा अलका...., सास तो तेरा बँड बजायेगी", या भीतीने दोन दिवस त्या मुलीला हात पण लावला नाही. अर्जुनरावांनी मुलीला मस्तपैकी घेतले. हॉस्पिटलमध्ये अगदी नर्स ने पण सांगितले, कितनी सुंदर लडकी हुई हे, मात्र अलका काय तिच्या कडे तिच्या कडे बघेना. पण दोन दिवसांनी तिला पान्हा फुटला आणि त्या लेकीचा स्वीकार केला. आता या मोठ्या घरात अगदीच दोन कळ्या उमलल्या होत्या. त्यांचे करायचे. त्यांना लहानाचे मोठे करायचे, शाळेत घालायचे, शिकवायचे मोठे करायचे ही मोठी जवाबदारी अलका ची होती. शिवाय बाकी कुटुंबाला सांभाळायचं होतच. 

मला स्त्रीवादी विचार किंवा फेमिनिस्ट तत्वज्ञानाबद्दल काही भाष्य करायचे नाही की कसे स्त्री ही अबला असते, समाजामध्ये मारीमारी असते. कसे स्त्रीपण तिचे शोषण करते. मात्र मुलगा झाला पाहिजे हा अट्टहास धरून पुढे सोनोग्राफी सारख्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मुलगा आहे की मुलगी हे पाहण्यास देखील सुरवात झाली. काही डॉक्टर तर अगदी बिनधास्त बोलायचे लग्न न झालेल्या मुली बिनधास्त करतात गर्भपात. मात्र तो गर्भपात करताना पाचव्या महिन्यात तो करणे म्हणजे अगदी मिनी डिलिव्हरी असल्याची पण पोराच्या हट्टापायी अगदी हे कृत्य चार वेळा घडले. तेंव्हा याला सरकारी दरबारी गुन्हा असे काही नव्हते मात्र या नंतर सातव्या वेळी जन्म घेतला. मी आधीच जन्मलो असतो तर जरा या अलका साठी बरे झाले असते. म्हणजे माझा जन्म बाकी कोणासाठी नाही तर अलका आता मनातून, सासूच्या माहिती नाही पण त्या धमकीतून मोकळी झाली होती. मी जन्मल्याच्या खुशीत माझ्या मामीने लाडू वाटले होते. भारत बंद होता पण तरीही मी जन्म घेतला होता. म्हणजे अगदीच खुशीचा माहोल होता. आणि हो सुरवातीला प्रेमळ शब्द याकरिता बोललो नाहीतर माझा जन्मच झाला नसता. या गोष्टी कळल्यावर मी मम्मीला नेहमी म्हणतो लक्षात घे मी जन्मलो म्हणून तू आहेस टिकून नाहीतर काय झाले असते. खरे म्हणजे माझे अस्तित्व तिच्यामुळे आहे पण माझे क्रेडीट मी कशाला सोडू. 

मुंबई मध्ये नोकरी करणारी ही अलका आता मस्तपणे आपली गृहस्थी सांभाळत होती. आजी सासू भिंतीवरच्या फोटोत गेल्या होत्या. त्यांनी त्या फोटोमध्ये जाण्याच्या आधी या आमच्या अलकाला एक गोष्ट सांगितली होती. गमतीची गोष्ट आहे. पण म्हणतात ना, दुश्मन का दुश्मन दोस्त होता हे, अगदी त्याच स्टोरी लाईन ची. तिला तिच्या सासूने जी धमकी दिली होती ती या आज्जीबाईंना माहीत झाली. पदरी दोन्ही मुलीचं या गोष्टीने निराश झालेल्या अलकाला, "अलका तू काही काळजी करू नकोस मी तुझ्या पोटी येईल", असे तिच्या आजी सासूबाई बोलल्या. "आधीच दोन मुली आणि त्यात तुम्ही तिसऱ्या", अलकाचा अगदी रडवेला सूर बोलत होता. "अग मी मुलगा बनून येईल". झालं आणि माझा जन्म झाला. काय ते म्हणावं. या आजीने जाताना काय बोलावं, आणि माझा जन्म व्हावा. बरं माझ्या कानाजवळ तीच खूण जी या पणजीच्या कानाला होती. वा म्हणजे माझा पुनर्जन्म झाला पण मला मला मागच्या जन्मतले अगदीच काही नाही, आठवत बरका. अगदी माझी त्या जुन्या नवऱ्याबरोबरची लव्हस्टोरी वैगरे काहीच नाही. पण अजूनही मला काही लोक म्हातारी आई म्हणतात. 

या दोघांच्या खांद्यावर पुण्यात जवाबदारी टाकून अलकाचे सासू सारसे देखील गावाला शेती करायला गेले होते. यांनी दोन बहिणींची लग्न पण मस्त थाटामाटात केली होती. घरातली माणसे कमी झाली होती पण आमच्या सारखी काही मंडळी अवतरली पण होती. एक नवे विश्व सुरू झाले होते. आता स्वतःचे कुटुंब पण सावरायचे होते. मोठे करायचे होते. मी तसा लहानपणापासूनच मवाली. अभ्यासाच्या नावाने थोडं अवघड च वाटायचे. बाहेर टवाळकी करायची मित्रांसोबत खेळायचे. मात्र या अलकीचे सदान कदा माझ्यावर लक्ष. म्हणजे मी असेलही लहानपणी तसा गोंडस बालक वैगरे. आणि हो अगदी नवसाचा पण म्हणायला हरकत नव्हती. पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून अगदी पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीला नवस केला होता, या नवरा-बायकोनं, मुलगा झाला तर दरवर्षी नारळाचे तोरण देण्याचे. मला ना या सर्व माझ्या बाबतीतल्या गोष्टी कोणत्या मराठी चित्रपटापेक्षा कमी नव्हत्या वाटत. नशीब नारळाचे तोरण बोलले होते नाहीतर त्या नवरा माझ्या नवसाचा मधल्या सचिन पिळगावकर सारखे काही बोलले असते तर झाली असती का माझी पंचायत. 

माझा अभ्यास घेण्याची अगदी मोठी जवाबदारी या अलकाच्या खांद्यावर होती. जबाबदारी या करिता कारण मोठ्या बहिणी त्यांच्या त्या इतक्या जवाबदारीने अभ्यास करायच्या, परीक्षेत नंबर आणायच्या. त्यांना अगदी सांगावे पण नव्हते लागत. मोठ्या भावंडांनी असे केले तर लहान भावंडांना अगदी मोठ्यांची उदाहरणे देऊन सगळं सहन करावे लागते. पण मी कुठे होतो ऐकणाऱ्यांमधला. त्यामुळे अलकाची माझ्या प्रति आणि मला सरळ करण्याप्रति जवाबदारी अधिक होती. मला शिकवताना झोपून शिकवायचे. असे ते बसून आपल्याला जमत नाही हे माझे लहानपणीचे थाट होते. आणि मग तसे तर तसे मी अगदी त्या अलकीच्या हातावर डोके ठेवून प्रत्येक धडे कविता वाचून दाखवायची. मग एक हातावर माझे डोके आणि दुसऱ्या हातात पुस्तक असे तिचे माझ्या साठी प्रशिक्षण होते. चाळीत पत्रांच्या घरात राहताना खूप मज्जा असल्याची. म्हणजे अगदी ती म्हण आहे ना भिंतींना कान असतात ती अगदी सत्य होताना दिसायची. पत्र्याचे घर होते आणि आमच्या या पत्राला कान आणि नाक दोन्ही होते. मिसरीचा धूर अगदी इकडून तिकडून यायचा आणि नाकात घुसायचा. कोणाच्या घरी कोणती भाजी केलीये हे देखील समजायचे. मागची पुढची चाळीतली भांडणे आम्ही टीव्ही बंद करून ऐकायचो. या सर्वांमध्ये माझा अभ्यास अगदी व्यवस्थित व्हावा म्हणून मम्मी मला अवघे पंचवीस पैसे तिकीट काढून घेऊन जायची. आणि तिथेच माझा अभ्यास घायची. दहावी झाली. बारावी झाली. पदवी परीक्षा पास झाली. नोकरी मिळाली. शिक्षण अजूनही चालू आहे. पण अभ्यास करण्याची जी सवय लागली ती अगदी पुढे जाऊन थांबलीच नाही. 

२०१९ मध्ये वडील गेले... मम्मी अर्धी तर तिथेच खचली. म्हणजे मुलगा पाहिजे म्हणून आधीच शरीराची झीज झाली होती. आणि त्यातून वयोमानानुसार बरेच आजार. काही दिवस अगदी शोकातच गेले. मात्र आम्ही भावंडे असे पाहिजे तितके मोठे नव्हतो झालो. हा नोकरी करतोय, पैसा कमावतोय पण म्हणतात ना मागे एक मोठा हात लागतो आणि आई नावाचा तो हात इतका मोठा असतो की आपल्यावर कधी संकट येतच नसते. आता तर ती दोन्ही भूमिका बजावते आहे. मम्मी पण तीच आहे, आणि पप्पा पण तीच आहे. 

तिची कहाणी काही अशी एका घडीची नाही. आयुष्यात बरेच रंग तिने पहिले होते. काही नात्यांचे, काही आजारपणाचे, काही मागचे, काही सध्याचे सर्वांना हळू हळू उतरायचे आहे या पानांवर.. पण सध्याला हे मातृ दिनानामित्त माझ्या जन्माची आणि जन्म्दात्रीची कहाणी. 


(क्रमश: )


अलोक अर्जुन अलका पवार   

Saturday, 1 May 2021

जातपंचायत आणि ती

 जातपंचायत आणि ती

प्रा. अलोक पवार

परवा सकाळ वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली. स्त्रियांवरील अत्याचार काही नवीन नाही. पण अत्याचाराच्या सीमा या काहीश्या वेगळ्या आणि न पटणाऱ्या जाणवल्या आणि म्हणून लिखाणाचे प्रयोजन. माझा पूर्ण लेख वाचून झाला की आपण निर्णय घेणे काहीतरी करणे निदान निषेध व्यक्त करणे आणि तो तीव्र निषेध व्यक्त करणे गरजेचे आहे.

पहिली आपण बातमी पाहू


अशा बातम्या महाराष्ट्रात होऊ शकतात, या जात पंचायती अजून पण डोके वर काढून महिलांना त्रास होईल अशा गोष्टी होऊ शकतात, हे अतिशय विचित्र चित्रण या बातमी मधून दिसून येते. 

जळगावच्या या महिलेला जेंव्हा दारू पिऊन तिचा नवरा मारहाण करून त्रास देतो तेंव्हा तिच्या सासरची मंडळी किंवा जात पंचायत काहीच कामाला येत नाही. अशा परिस्थितीत पद्धतशीर मार्गाने न्यायालयातून तिला घटस्फोट मिळतो देखील. घटस्फोट घेऊन तिचा मारहाणीचा त्रास तर कमी होतो. मात्र २०११ मध्ये घेतलेला घटस्फोट अमान्य होऊन २०१९ पर्यंत या महिलेला जात पंचायती कडून पुन्हा त्रास सहन करावा लागत होता आणि तिला त्याच व्यक्तींसोबत पुनर्विवाह करण्यास भाग पाडले जाते.

आता लग्न करून सर्व व्यवस्थित होईल असे अपेक्षित मात्र म्हणतात ना स्त्री तुझ्या जन्माची कहाणी पहा या नाथजोगी समाजाने या स्त्रीला तब्बल एक लाख दंड दिला. जी स्त्री पुरुषाच्या जाचाला कंटाळून इतके वर्ष वेगळी राहते आहे तिची मानसिक व्यथा इतकी व्यवस्थित असेल की ती तब्बल एक लाख कमावून या जात पंचायतीला देईल, म्हणजे आधीच त्रास कमी म्हणून ही आर्थिक शिक्षा.

बर एक बाजूला ही आर्थिक शिक्षा मान्य करू मात्र या स्त्रीला पुढे या जात पंचायतीने अमानुषपणे शिक्षा वाढवली. सध्या कोरोना महाराष्ट्रात धुमाकूळ घालतो आहे. आपण स्वच्छता पाळायची, सार्वजनिक जागी थुंकायचे नाही, सॅनीटायझेशनचे महत्व या सर्व गोष्टी असून या पंचांनी त्या महिलेला त्यांची थुंकी चाटायची शिक्षा दिली. बर या पंचांची ही थुंकी इतकी पवित्र का की केळीच्या पानावर ती थुंकी तिला चाटण्यास घ्यावी. जात पंचायती बंद करून राज्य घटनेमध्ये त्या विषयी तरतूद करून दिली आहे.

या महिलेला बहिष्कार करून वाळीत टाकणे जात पंचायतीने अमानुषपणे पैसे मागणी किंवा असे थुंकी चाटण्याची शिक्षा देणे या सर्व गोष्टी या महाराष्ट्रात होताना दिसतात. आपण या महाराष्ट्र राज्याला पाहिले असे राज्य म्हणून घोषित केले की बहिष्कार संरक्षण अधिनियम कायदा २०१६ नुसार इथे तयार झाला आणि अस्तित्वात आला. राज्यघटनेमध्ये कलम १४ आणि २१ मध्ये या गोष्टी विरुद्ध तरतुदी करून ठेवल्या आहेत. तरीही या जात पंचायती त्यांच्या अमानुषपणा सोडत नसतील तर आता आपण जागे होणे गरजेचे आहे. काहींनी लेखणी घेऊन तर काहींनी कायद्याची चौकट बनून या महिलेसारख्या अनेक महिलांना साथ दिली पाहिजे. शिक्षण हा या मागचा उत्तम उपाय आहे. नाहीतर जाती पातीच्या आणि स्वतःचा अट्टहास जोपासण्यासाठी या पंचायती असे नीच निर्णय देतच राहणार. आणि अशा बातम्या येतच राहणार. गृहविभागांने किंवा सामाजिक न्याय व्यवस्थेने या बाबतीत मध्ये पडणे अतिशय गरजेचे आहे. तसेच पोलीस खात्याने देखील सामंजस्याने स्वतःची मध्यस्थाची भूमिका घेऊन योग्य शिक्षा सुनावणी करणे गरजेचे आहे. या जात पंचायती विरुद्ध दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली पाहिजे. महिलेला भीती दाखवणे, कटकारस्थान करणे असे गुन्हाचे स्वरूप पुढे येऊ शकते. तसेच सकाळ सारख्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून ही बातमी जेंव्हा पुढे येते तेंव्हा भविष्यात अशा घटना घडू नये या साठी कोणती शिक्षा किंवा खटले जात पंचायती वर झाली याची वार्ता देखील जाहीर केली पाहिजे. जेणे करून निदान आपल्या महाराष्ट्रात जिथे छत्रपती शिवाजी महाराज, फुले दाम्पत्य, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी नेतृत्व केलं त्याच धर्तीवर असे महिलांवर काही प्रसंग घडणार नाहीत

जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

  जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक © डॉ. अलोक पवार  M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थाप...