रमाई आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून कळलेले प्रेमी बाबासाहेब
डॉ. अलोक पवार
नुकतीच ७ फेब्रुवारी ला रमाई आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारताने साजरी केली. बहुजन संघटन यांच्या वतीने रमाई आंबेडकर ते माई आंबेडकर या विषयावर फेसबुक लाईव्ह ठेवले होते. आणि ते लाईव्ह आमच्या धडाडीच्या अशा आश्लेषा जाधव मॅडम यांच्या कडून दिले गेले. त्यांच्या व्याख्यानाला अनुसरून हा लेख.
एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. आणि तो पुरुष जर युगपुरुष असेल आणि त्यामागची किंवा त्याला युगपुरुष घडविण्यात कोण्या स्त्रीचा योगदान असेल तर आपल्याला रमाई आंबेडकर नाव पुढे येताना दिसते. म्हणजे आपण जेंव्हा जेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध कामगिऱ्या बघतो तेंव्हा आपण इतर कोणाचा विचार देखील करत नाही. मात्र रमाई यांचा विचार तितकाच प्रखर पणे केलाच पाहिजे. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रमा यांचा विवाह बाबासाहेबांसोबत ठरतो तेंव्हा रमा या फक्त नऊ वर्षाच्या होत्या आणि बाबासाहेब नववीत शिकत होते. नववीत शिकणारे बाबासाहेब पुढील वर्षी म्हणजे त्या काळाची मॅट्रिक परीक्षा पास होणार आहे, ही बातमी कळताच रमा यांच्या मनात एक नवचैतन्य निर्माण झाले होते. माझा नवरा हा मला इतका शिकलेला भेटतोय, त्या काळाच्या सामान्य मुलीच्या मनातील एक मोठा मानाचा विषय म्हणायला हरकत नाही. जेंव्हा बाबासाहेब हे उच्च शिक्षित दिसून येतात तेंव्हा काही लोक त्यांची किंवा रमाबाई - बाबासाहेब यांची तुलना सावित्री - ज्योतिबांशी देखील करतात. बाबासाहेब हे तर महात्मा फुले यांना आपले गुरु मानतात मग त्यांनी आपल्या पत्नीला का शिकवले नाही असा एक प्रश्न पुढे येताना दिसतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पत्नीला शिकवलेले दिसतेच. रमाबाई यांनी स्वतः आपल्या हाताने बाबासाहेबांना जो पत्र व्यवहार केला त्यावरून त्यांची सुरवात तर शिकण्यासाठी झालेली तर स्पष्ट दिसून येते मात्र स्वतः रमाबाईंची इच्छा होती की जे बाबासाहेब दिनदलितांचे हित कसे होईल, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा कशी फोडली जाईल या ठिकाणी झटत होते त्यांचे पुढील शिक्षण देखील महत्वाचे वाटते. मग जेंव्हा बाबासाहेब मॅट्रिक होऊन पुढे अजून शिकत आहेत तेंव्हा कौटुंबिक कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना होता कामा नये म्हणून ती सर्व धुरा सांभाळताना रमाबाई दिसतात.
कोणत्याही प्रकारच्या कौटुंबिक अडचणी ज्या बाबासाहेब यांच्या शिक्षणात बाधा बनू शकतील या सर्व गोष्टी रमाबाई स्वतः दूर करायच्या. एक असाच प्रसंग जो रमाबाई अगदी धीराने सामोरे जाताना दिसतात तो म्हणजे रमेश म्हणजे त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या वेळीचा. बाबासाहेब त्यांच्या शिक्षणासाठी अमेरिकेत होते. आणि त्याच वेळी रमेशचा मृत्यू झाला. रमाबाई इकडे होत्या. मात्र बाबासाहेब यांना ही गोष्ट कळली तर त्यांची धावपळ होईल, कदाचित त्यांच्या चालू शिक्षणात काही व्यत्यय येईल म्हणून रमाबाईंनी साहेबांपर्यंत ही बातमी गेली नाही पाहिजे याची खबरदारी घेतली. व पुढे पत्र व्यवहार करताना त्यांनी स्वतः आपल्या पोटच्या गोळ्याच्या मृत्यू बाबत ही बाब बाबासाहेब यांना सांगितली. त्यांनी बाबासाहेबांना सांगितले की तुमच्या अभ्यासात कोणत्याही प्रकाराचा खंड पडता कामा नये, तुमच्या समाज बांधणी च्या कार्यात खंड पडता कामा नये म्हणून तुम्ही इकडे येऊ नका. रमा या उगाच रमाई म्हणजे या भारताच्या आई उगाच नाही झाल्या. त्यांनी केलेला हा त्याग संपूर्ण भारतभूमी समोर अगदी ज्वलंत दिसतो. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना कौटुंबिक मोहापासून अगदी लांब ठेवलेले अगदी स्पष्ट दिसून येते. जर त्यांनी बाबासाहेब यांना कौटुंबिक मोहात अडकवले असते, मला ही सुखाची अनुभूती पाहिजे असा हट्ट केला असता तर आज मुळात जो युगपुरुष आपल्या समोर आहे तो अजिबातच नसता. कारण त्यांनाही माहिती होते की बाबासाहेब म्हणजे बऱ्याच लोकांचं नेतृत्व करण्यासाठी तयार होणारी व्यक्ती आहे. मग त्यांचा शिक्षणात कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये.
रमाबाई जेंव्हा लग्न करून आल्या तेंव्हा त्यांच्या घरची परिस्थिती ही फार काही थाटाची होती, असे अजिबात नव्हती. स्पष्ट बोलायचे तर सध्याचे मध्यमवर्गीय कुटुंब असते ना तशी देखील नव्हती. त्यांना आत्ताच्या मुली जशा हौसमौज करतात नवऱ्याकडे मला ही साडी घेऊन द्या ती साडी घेऊन द्या अशा चैनीच्या गोष्टी मागण्याची देखील मुभा नव्हती. मुभा नव्हती म्हणण्यापेक्षा त्यांना समोर ज्या परिस्थिती मध्ये आपण जगतो आहोत त्याला त्या अगदी मनापासून स्वीकार करत होत्या. बाबासाहेब आंबेडकरांची तर त्यांना ताकीत होती की भाजीला तेल किती वापरायचे, महिन्याला दोन माचीस बॉक्स वापरले गेले पाहिजे. त्यापेक्षा जास्ती नको. रमाई काटकसरीने कुटुंबाचा गाडा अगदी व्यवस्थितपणे चालवीत होत्या. बाबासाहेब आंबेडकर विदेशात असताना घरात ज्या चार भाकऱ्या व्हायच्या त्यांची वाटणी करताना देखील मुलांमध्ये तीन आणि उरलेली एक भाकरी त्या, त्यांची जाव आणि आत्या या तिघींमध्ये वाटून खाल्या जायच्या. अगदी पोटाला चिमटा काढत होत्या, उद्देश एकच होता बाबासाहेबांचा जो अभ्यास चालू आहे त्याला कुठे खंड पडू देता कामा नये. कारण बाबासाहेबांचा अभ्यास हा बाबासाहेब यांचं भविष्य नव्हतं ते भविष्य होत उभ्या भारताच. ते स्वप्न होत भारतातल्या त्या लोकांचं ज्यांच्यावर आत्तापर्यंत हालअपेष्टांचे ओझे लादले गेले आहे. या मध्ये स्वतःच्या पोटाला चिमटा काढणारी ही रमा किती विचार करते आहे हे स्पष्ट दिसून येते.
रमाई या देखील समाजाची आई होताना प्रखरपणे दिसतात त्या म्हणजे धारवाडच्या एका प्रसंगावरून. त्यांची तब्बेत व्यवस्थित नव्हती. म्हणून हवापालट करण्यासाठी त्या धारवाडला गेल्या होत्या. तेथे जे वसतिगृह होते, तेथे शिकणाऱ्या मुलांना वसतिगृहमध्ये आर्थिक अडचणींच्या मुळे काहीच अन्न शिल्लक नव्हते. रमाबाईंनी अगदी क्षणाचाही विचार न करता आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या देऊन वसतिगृहाच्या प्रमुखांनां अगदी त्वरित विद्यार्थ्यांना लागते तशा धान्याची सोय करायला लावली. स्वतः जिथे राहत नाहीत, ज्या हवा बदलायला धारवाडला आल्या होत्या तेथील वसतिगृहमधील मुलांची काळजी. उपेक्षितांची ही रमाई अगदी प्रखरतेने आपल्या समोर येते.
कालांतराने रमा यांना क्षयाने ग्रासलेले दिसते. रमाबाई यांनी बाबासाहेबांना त्या आजारात अगदी शेवटची इच्छा म्हणून मला पंढरपूरला घेऊन चला असे म्हणाल्या. पंढरपूरला मला विठोबाचे दर्शन घ्यायचे म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी. बाबासाहेबांनी त्यावेळी देखील रमा यांना समजावून सांगितलेले दिसून येते. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनभर जो त्रासाचा अन्यायाचा डोंगर बघितला होता व त्याच डोंगराची चढाई बाबासाहेब करीत होते. बाबासाहेबांनी रमाई यांना असे सांगितले होते की रमाई हि जी इच्छा तू व्यक्त करते आहेस ती तर मी पूर्ण करणार नाही मात्र तुझ्यासाठी एक नवीन पंढरपूर मी साकारतो आहे ज्यामध्ये सर्वांसाठी समानता प्रस्थापित होणार आहे. ज्यावेळी रमाबाई यांना ही सत्याची बाजू पटते तेंव्हा त्या देखील पंढरपूरचा आपला आग्रह टाळतात.
जी रमा हिने तिच्या आईवडिलांचा शेवट बघितला, जी रमा हिने एकटीनेच अगदी नवऱ्याशिवाय आपल्या पोटच्या चार मुलांचा शेवट बघितला ती रमा ती रमाई अगदी या क्षणात एकटी दिसते. तिच्या शेवटच्या क्षणात ती एकटीच दिसते. एका क्रांतिसूर्याला प्रखर करण्यासाठी ती हरवली होती, ती तिच्या अंताकडे आली होती. तिची ज्योत मावळली वयाच्या अगदी सदोतिसाव्या वर्षी.
बाबासाहेब शिकले, ते भारतातल्या अन्यायग्रस्त लोकांसाठी उभे राहिले. पण त्यांच्या मागे असलेली अगदी खंबीरपणे उभी राहिलेली त्यागमूर्ती रमाई हिचा विसर होता अजिबातच कामा नये.
बाबासाहेब जे लग्न झाल्यावर फक्त मॅट्रिक होणार होते ते आज बॅरिस्टर, पीएचडी आणि भारतातील उच्च शिक्षित झाले होते. त्यामध्ये रमाई यांचा पुरेपूर वाटा होता.
रमाबाई गेल्यावर तब्बल १३ वर्षांनी बाबासाहेब यांच्या आयुष्यात माई आल्या. माईंचे त्यांच्या आयुष्यात येणे हे आज देखील बऱ्याच लोकांच्या मनात सलते. माई या घातकी होत्या, ब्राम्हण समाजातील माई या बाबासाहेबांसाठी विषकन्या होत्या. मात्र हे सर्व बोलताना आपण सत्याचा विचार करणे तेवढेच गरजेचे आहे. आपण जेंव्हा माई योग्य व्यक्ती नाही तेंव्हा आपण माईंच्या वर नाही तर थेट बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या निवडीवर शंका घेतो. त्यांचा निर्णय चुकीचा आहे असा प्रश्न उपस्थित करतो.
बाबासाहेब जेंव्हा कामासाठी आपल्या हितासाठी उभे राहायचे तेंव्हा ते आहेत तसे जागेवर १८ तास सलग उभे रहायचे. या सर्वांचा परिणाम आपण आज जी समानता आपण बघतो आहे, आज आपल्याकडे जी संविधानाची ताकत आहे ते देखील त्याचेच फलित आहे. मात्र या सर्व गोष्टींचा बाबासाहेब आंबेडकर यांच्या शरीरावर एक वाईट परिणाम झाला तो म्हणजे त्यांना मधुमेह झाला. ते नेहमी जेंव्हा काम करायचे तेंव्हा त्यांच्या आजूबाजूला त्यांचे अनुयायी असायचे मात्र खाजगी आयुष्यात त्यांच्याकडे त्यांच्या तब्बेतीकडे पाहणारे कोणीच नव्हते. त्यांच्या मधुमेहाचा इलाज करण्यासाठी ते जेंव्हा डॉक्टर कडे जायचे तेंव्हा तेथे शारदा कबीर या ज्युनिअर डॉक्टर होत्या. त्या एम.बी.बी.एस. झाल्या होत्या. त्या स्वतःदेखील आंबेडकरांच्या इलाजाकडे लक्ष द्यायच्या. त्यांनी आंबेडकरांच्या तब्बेतीची इतकी काळजी घेतली की रमाई यांच्या नंतर बाबासाहेबांना कोणीतरी आपलेसे वाटायला लागले होते. बाबासाहेबांनी एका पत्राद्वारे शारदा यांना लग्नाचा प्रस्ताव दिला होता. त्यांनी त्यामध्ये 'प्रिय शरू' असा उल्लेख केला होता. शारदा उर्फ सविता यांना ते पत्र मिळताच त्यांनी घरच्यांशी बोलून त्यांना लग्नासाठी हो म्हणले होते. लग्नाच्या वेळी मजेची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आणि शारदा कबीर यांच्यामध्ये तब्बल २८ वर्षाचे अंतर होते. तरीही त्यांच्यामधील प्रेमसंबध कधीच कमी दिसले नाही.
त्यांच्या प्रेमाचे आणखीन गोष्टी जेंव्हा सविता आंबेडकर उलघडतात तेंव्हा सविता आंबेडकर त्यांच्या लिखाणामध्ये म्हणतात की, डॉ. बाबासाहेब जेंव्हा संसंद भवनात बसायचे तेंव्हा तेंव्हा त्या ठिकाणी सामान्य लोकांना संसदेतील कामकाज बघण्यासाठी एक वेगळे दालन असायचे. आपले काम आपल्या आपल्या पत्नीने देखील बघावे यासाठी आंबेडकर त्यांना गाडी पाठवायचे. येताना ही साडी घालून ये असा आदेशही सावितांना म्हणजे आंबेडकरांच्या शरू साठी असायचा. आणि साविताजींनी तो आदेश पाळला नाही तर आंबेडकरांचा प्रेमपूर्ण अबोला देखील सविताजींना झेलावा लागायचे. बाबासाहेबांचे त्याच्या शरू वर प्रचंड प्रेम होते. तसे साविताजींचे देखील बाबासाहेबांवर भरपूर प्रेम होते. एकदा जेव्हा औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयात आंबेडकरांना बोलावणे आले होते तेंव्हा सविताजींना दिसले की बाबसाहेबांची विजार पूर्णपणे त्यांच्या मलाने भरली होती. त्यांना त्या दुर्गंधीवरून ती गोष्ट जाणवली होती. सविताजींनी त्वरित गाडी पुन्हा हॉटेलवर घेऊन बाबासाहेबांची स्वच्छता करून त्या महाविद्यालयातील कार्यक्रमात हजेरी लावली होती.
जेंव्हा आपण रमाई आणि सावितामाई यांच्याकडे पाहतो तेंव्हा बाबासाहेब यांच्या आयुष्यातील दोन पर्व आपल्या समोर येतात. एक त्यांच्या शिक्षणाच्या आयुष्यात त्यांना भरभरून साथ देणारी रमाई दिसते आणि दुसरी जेंव्हा स्वतंत्र भारताच्या संविधानाचे काम आंबेडकर करतात तेंव्हा त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घेणारी त्यांची सविता माई दिसून येते. या दोघींवर आंबेडकरांनी प्रचंड प्रेम केले.

No comments:
Post a Comment