Friday, 7 May 2021

आमची अलकी : मातृदिना निमित्त

 आमची अलकी  : मातृदिनानिमित्त 


"हे बघ अलका, दोन मुली झाल्यात मुलगा झाला नाही तर माझ्या अर्जुन चे दुसरे लग्न लावून देईल", हे प्रेमळ (अय्या खरंच प्रेमळ का म्हणतोय हे नंतर सांगतो) शब्द होते आमच्या स्वर्गीय आजीबाई यशोदा पवार यांचे. पप्पा तसे एकदम रुबाबदार, गोरे घारे असण्यामुळे कोणतीही बाई कदाचित पुनर्विवाह करू शकते ही दाट भीती मम्मी म्हणजे आमच्या अलकाच्या मनात दाट शक्यता घर करून बसली होती. आपला पती हाच परमेश्वर असतो, त्याच्या घरावर, घरातल्या माणसांवर अगदी मनापासून प्रेम करायचे असते. अशी पूर्ण तंबी लग्न होताना अलका च्या माहेरच्यांनी तिला दिली होती. म्हणूनच सारस बागेतल्या गणपती मंदिरात अर्जुनरावांना या अलकी ने एक वचन दिले होते. "मी मोठा भाऊ आहे, माझ्या मागे माझे पाच भाऊ बहीण आहेत, तू सर्वांच करशील ना? माझे घर सांभाळशील ना?", आणि म्हणतात हे लैला-मजनू, प्यार मे डूबे होते हे, लडकी ने भी प्यार के खातीर, 'हा' करदी. घर खरच मोठे होते, आकाराने नव्हे माणसांनी. सासू - सासरे, नवरा, तीन लहान दिर, दोन नणंदा, आणि एक आजीसासू सुद्धा. आकार म्हणावा तर अगदी दहा बाय दहा च्या दोन खोल्या, पत्राच्या. त्याही अगदी पूरग्रस्तांना महानगर पालिकेच्या वतीने मिळालेल्या. फक्त आपला नवरा असा हँडसम आहे हे बघून या मोठ्या घरात आपले शिक्षण, नोकरी अर्धवट सोडून मुंबईचे भन्नाट आयुष्य सोडून ही अलका अगदीच चाळींच्या घरात आली होती. 

ती मस्त या सर्व गोष्टींची मज्जा घेत होती. म्हणजे अगदी भाज्यांना कशी फोडणी द्यायची हे व्यवस्थित माहिती नसलेली ही अलका इतक्या माणसांचा स्वयंपाक करायचा, सार्वजनिक नळावर पाणी भरायला जायचे या सर्व गोष्टी अगदी आनंदाने स्वीकारू लागली होती. पहिली मुलगी झाल्यावर साधारण आनंद होतो तसा झाला होता सर्वांना, तिलाही झाला होता, मात्र पुढे आली तीच ती आजीची धमकी. मात्र यावेळी देखील मुलगी झाली. अलका ने "अब तेरा क्या होगा अलका...., सास तो तेरा बँड बजायेगी", या भीतीने दोन दिवस त्या मुलीला हात पण लावला नाही. अर्जुनरावांनी मुलीला मस्तपैकी घेतले. हॉस्पिटलमध्ये अगदी नर्स ने पण सांगितले, कितनी सुंदर लडकी हुई हे, मात्र अलका काय तिच्या कडे तिच्या कडे बघेना. पण दोन दिवसांनी तिला पान्हा फुटला आणि त्या लेकीचा स्वीकार केला. आता या मोठ्या घरात अगदीच दोन कळ्या उमलल्या होत्या. त्यांचे करायचे. त्यांना लहानाचे मोठे करायचे, शाळेत घालायचे, शिकवायचे मोठे करायचे ही मोठी जवाबदारी अलका ची होती. शिवाय बाकी कुटुंबाला सांभाळायचं होतच. 

मला स्त्रीवादी विचार किंवा फेमिनिस्ट तत्वज्ञानाबद्दल काही भाष्य करायचे नाही की कसे स्त्री ही अबला असते, समाजामध्ये मारीमारी असते. कसे स्त्रीपण तिचे शोषण करते. मात्र मुलगा झाला पाहिजे हा अट्टहास धरून पुढे सोनोग्राफी सारख्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मुलगा आहे की मुलगी हे पाहण्यास देखील सुरवात झाली. काही डॉक्टर तर अगदी बिनधास्त बोलायचे लग्न न झालेल्या मुली बिनधास्त करतात गर्भपात. मात्र तो गर्भपात करताना पाचव्या महिन्यात तो करणे म्हणजे अगदी मिनी डिलिव्हरी असल्याची पण पोराच्या हट्टापायी अगदी हे कृत्य चार वेळा घडले. तेंव्हा याला सरकारी दरबारी गुन्हा असे काही नव्हते मात्र या नंतर सातव्या वेळी जन्म घेतला. मी आधीच जन्मलो असतो तर जरा या अलका साठी बरे झाले असते. म्हणजे माझा जन्म बाकी कोणासाठी नाही तर अलका आता मनातून, सासूच्या माहिती नाही पण त्या धमकीतून मोकळी झाली होती. मी जन्मल्याच्या खुशीत माझ्या मामीने लाडू वाटले होते. भारत बंद होता पण तरीही मी जन्म घेतला होता. म्हणजे अगदीच खुशीचा माहोल होता. आणि हो सुरवातीला प्रेमळ शब्द याकरिता बोललो नाहीतर माझा जन्मच झाला नसता. या गोष्टी कळल्यावर मी मम्मीला नेहमी म्हणतो लक्षात घे मी जन्मलो म्हणून तू आहेस टिकून नाहीतर काय झाले असते. खरे म्हणजे माझे अस्तित्व तिच्यामुळे आहे पण माझे क्रेडीट मी कशाला सोडू. 

मुंबई मध्ये नोकरी करणारी ही अलका आता मस्तपणे आपली गृहस्थी सांभाळत होती. आजी सासू भिंतीवरच्या फोटोत गेल्या होत्या. त्यांनी त्या फोटोमध्ये जाण्याच्या आधी या आमच्या अलकाला एक गोष्ट सांगितली होती. गमतीची गोष्ट आहे. पण म्हणतात ना, दुश्मन का दुश्मन दोस्त होता हे, अगदी त्याच स्टोरी लाईन ची. तिला तिच्या सासूने जी धमकी दिली होती ती या आज्जीबाईंना माहीत झाली. पदरी दोन्ही मुलीचं या गोष्टीने निराश झालेल्या अलकाला, "अलका तू काही काळजी करू नकोस मी तुझ्या पोटी येईल", असे तिच्या आजी सासूबाई बोलल्या. "आधीच दोन मुली आणि त्यात तुम्ही तिसऱ्या", अलकाचा अगदी रडवेला सूर बोलत होता. "अग मी मुलगा बनून येईल". झालं आणि माझा जन्म झाला. काय ते म्हणावं. या आजीने जाताना काय बोलावं, आणि माझा जन्म व्हावा. बरं माझ्या कानाजवळ तीच खूण जी या पणजीच्या कानाला होती. वा म्हणजे माझा पुनर्जन्म झाला पण मला मला मागच्या जन्मतले अगदीच काही नाही, आठवत बरका. अगदी माझी त्या जुन्या नवऱ्याबरोबरची लव्हस्टोरी वैगरे काहीच नाही. पण अजूनही मला काही लोक म्हातारी आई म्हणतात. 

या दोघांच्या खांद्यावर पुण्यात जवाबदारी टाकून अलकाचे सासू सारसे देखील गावाला शेती करायला गेले होते. यांनी दोन बहिणींची लग्न पण मस्त थाटामाटात केली होती. घरातली माणसे कमी झाली होती पण आमच्या सारखी काही मंडळी अवतरली पण होती. एक नवे विश्व सुरू झाले होते. आता स्वतःचे कुटुंब पण सावरायचे होते. मोठे करायचे होते. मी तसा लहानपणापासूनच मवाली. अभ्यासाच्या नावाने थोडं अवघड च वाटायचे. बाहेर टवाळकी करायची मित्रांसोबत खेळायचे. मात्र या अलकीचे सदान कदा माझ्यावर लक्ष. म्हणजे मी असेलही लहानपणी तसा गोंडस बालक वैगरे. आणि हो अगदी नवसाचा पण म्हणायला हरकत नव्हती. पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून अगदी पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीला नवस केला होता, या नवरा-बायकोनं, मुलगा झाला तर दरवर्षी नारळाचे तोरण देण्याचे. मला ना या सर्व माझ्या बाबतीतल्या गोष्टी कोणत्या मराठी चित्रपटापेक्षा कमी नव्हत्या वाटत. नशीब नारळाचे तोरण बोलले होते नाहीतर त्या नवरा माझ्या नवसाचा मधल्या सचिन पिळगावकर सारखे काही बोलले असते तर झाली असती का माझी पंचायत. 

माझा अभ्यास घेण्याची अगदी मोठी जवाबदारी या अलकाच्या खांद्यावर होती. जबाबदारी या करिता कारण मोठ्या बहिणी त्यांच्या त्या इतक्या जवाबदारीने अभ्यास करायच्या, परीक्षेत नंबर आणायच्या. त्यांना अगदी सांगावे पण नव्हते लागत. मोठ्या भावंडांनी असे केले तर लहान भावंडांना अगदी मोठ्यांची उदाहरणे देऊन सगळं सहन करावे लागते. पण मी कुठे होतो ऐकणाऱ्यांमधला. त्यामुळे अलकाची माझ्या प्रति आणि मला सरळ करण्याप्रति जवाबदारी अधिक होती. मला शिकवताना झोपून शिकवायचे. असे ते बसून आपल्याला जमत नाही हे माझे लहानपणीचे थाट होते. आणि मग तसे तर तसे मी अगदी त्या अलकीच्या हातावर डोके ठेवून प्रत्येक धडे कविता वाचून दाखवायची. मग एक हातावर माझे डोके आणि दुसऱ्या हातात पुस्तक असे तिचे माझ्या साठी प्रशिक्षण होते. चाळीत पत्रांच्या घरात राहताना खूप मज्जा असल्याची. म्हणजे अगदी ती म्हण आहे ना भिंतींना कान असतात ती अगदी सत्य होताना दिसायची. पत्र्याचे घर होते आणि आमच्या या पत्राला कान आणि नाक दोन्ही होते. मिसरीचा धूर अगदी इकडून तिकडून यायचा आणि नाकात घुसायचा. कोणाच्या घरी कोणती भाजी केलीये हे देखील समजायचे. मागची पुढची चाळीतली भांडणे आम्ही टीव्ही बंद करून ऐकायचो. या सर्वांमध्ये माझा अभ्यास अगदी व्यवस्थित व्हावा म्हणून मम्मी मला अवघे पंचवीस पैसे तिकीट काढून घेऊन जायची. आणि तिथेच माझा अभ्यास घायची. दहावी झाली. बारावी झाली. पदवी परीक्षा पास झाली. नोकरी मिळाली. शिक्षण अजूनही चालू आहे. पण अभ्यास करण्याची जी सवय लागली ती अगदी पुढे जाऊन थांबलीच नाही. 

२०१९ मध्ये वडील गेले... मम्मी अर्धी तर तिथेच खचली. म्हणजे मुलगा पाहिजे म्हणून आधीच शरीराची झीज झाली होती. आणि त्यातून वयोमानानुसार बरेच आजार. काही दिवस अगदी शोकातच गेले. मात्र आम्ही भावंडे असे पाहिजे तितके मोठे नव्हतो झालो. हा नोकरी करतोय, पैसा कमावतोय पण म्हणतात ना मागे एक मोठा हात लागतो आणि आई नावाचा तो हात इतका मोठा असतो की आपल्यावर कधी संकट येतच नसते. आता तर ती दोन्ही भूमिका बजावते आहे. मम्मी पण तीच आहे, आणि पप्पा पण तीच आहे. 

तिची कहाणी काही अशी एका घडीची नाही. आयुष्यात बरेच रंग तिने पहिले होते. काही नात्यांचे, काही आजारपणाचे, काही मागचे, काही सध्याचे सर्वांना हळू हळू उतरायचे आहे या पानांवर.. पण सध्याला हे मातृ दिनानामित्त माझ्या जन्माची आणि जन्म्दात्रीची कहाणी. 


(क्रमश: )


अलोक अर्जुन अलका पवार   

No comments:

Post a Comment

जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक

  जिजामाता : एक कुशल व्यवस्थापक © डॉ. अलोक पवार  M.Sc. Comp. Sci. MBA, MSc Comm. Physics, MPhil, PhD जेंव्हा जेंव्हा वाणिज्य किंवा व्यवस्थाप...