माझे मत.... मंदिर प्रवेश आणि मी आणि 'त्या' ही.
प्रा. अलोक पवार
नुकत्याच बीड मधील एका गावामध्ये मस्त दहा दिवस राहायला गेलो. तिथल्या एका देवस्थानामध्ये म्हणजे शंकराच्या अवताराच्या मंदिरात जाण्याचा योग आला. शंकर अवतार आदिनाथाचे ते मंदिर. त्या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड दुष्काळ बीड मध्ये असला. बीड मध्ये भरपूर लाईट जाण्याची शंका असली तरी या मंदिरात अहोरात्र भल्या दुपारी सुद्धा थंडगार हवा सुटलेली असते. अगदी दुपार कुठे घालवायची तर त्या मंदिरात असा मस्त प्लॅन होता माझा दहा दिवस. पहिला दिवस तर अगदी त्याच मंदिराच्या थंडगार हवेत गेला. त्याच दिवशी गावात माझ्या भावाचा सत्कार केला गावकऱ्यांनी. मग मी अशीच शंका उपस्थित केली की चला जेवणामध्ये, 'कुछ मिठा हो जाये'. पण परत दुष्काळी गाव तिथे काय भेटणार अगदी ताज्या भाज्या पण मंगळवारच्या बाजारात. मग मी म्हणालो चला नारळ आहे घरात ज्याने सत्कार झाला त्याची वडी करता येईल. भावाला म्हणालो नारळ फोडून दे मी नारळाच्या वड्या करतो जेवायला. हे आज्जीने ऐकून तो नारळ तिकडे आदिनाथाच्या मंदिरात जाऊन फोडून या म्हणाल्या. मग मी म्हणालो चला आपण सगळेच मंदिरात एकत्रित दर्शन घेऊयात. ( माझा उद्देश असाच होता सर्वांनी मस्त गार हवा खाऊन येऊयात) आणि बघता बघता आज्जी आजोबा दोन्ही भावंड, आई, वडील सगळे आम्ही मंदिरात. लहान भावाने मंदिरातील एक लिहिलेलं वाक्य दर्शनास आणून दिले जे मी आधल्या दिवशी अजिबात बघितले नव्हते. "या मंदिरात महिलांनी प्रवेश करू नये". बरं हे मंदिर फार पुरातन काळातील अजिबातच नव्हते म्हणजे येथील लोकांनी वर्गणी करून बांधलेले होते. बरं सगळे वर्गणीदार गावातली सध्याची तरुण पिढी. मग हा स्त्रियांना आतमध्ये न घेण्याचा निर्णय याच पिढीकडून स्वागतार्ह असावा असे जाणवले. अतिशय भयानक निर्णय वाटला. आज्जी बाहेरून म्हणाल्या जा तुम्ही आतमध्ये नारळ फोडायला आम्ही म्हणजे आई आणि त्या बाहेरूनच थांबू असे म्हणाल्या. मी म्हणालो मी नाही जाणार. त्याच्यापुढे त्या म्हणाल्या तुम्हाला चालेल आम्हा बाया माणसांना आतमध्ये नाही जायचे. मी म्हणालो जिथे स्त्रियांना आतमध्ये स्थान नाही तिथे त्याच स्त्रियांनी जन्माला घातलेल्या पुरुषांनी का जावे. इथे फक्त अशा पुरुषांनी जायला पाहिजे ज्यांना फक्त आणि फक्त पुरुषांनी जन्म दिलाय. मी नाहीच गेलो. माझ्या मनातील चलबिचल सुरूच होती त्या हवेशीर मंदिराबाबत. अवघड होते सगळे. ज्या गावात स्त्रियांना त्यांची लाज झाकायला साधी संडास ची सोय नव्हती तिथे लोकांनी वर्गणी काढून काढून देवस्थाने बांधली आणि त्यामध्ये फक्त वर्गणीदार पुरुष प्रवेश करणार. दुसरी गोष्ट मला आणखीन खटकली ती म्हणजे मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीवर टीप टीप पाण्याच्या अभिषेक होत होता. पुराण वैगरे काही बघितले तर आपण त्याला पाणी म्हणण्यापेक्षा "गंगा" असे म्हणतो. बरं ही गंगा स्त्री असून आतमध्ये कशी हे कळले नाही. याच पिंडीवर कधी कधी दुधाने अभिषेक होतो ते गाईचेच बरे त्या गाईच्या दुधाला पण आतमध्ये प्रवेश. आणि महत्वाचे म्हणजे शंकर हा महादेव नेहमी पार्वतीच्या अर्धरूपाने ओळखला जात असेल तर तिथे पार्वती असेलच मग या स्त्रियांना का आतमध्ये प्रवेश नाही. पाळीच्या दिवसात स्त्रिया या अपवित्र असतात वैगरे वैगरे, असतील तर इतर दिवसात काय अडचणी आहेत आणि मग म्हाताऱ्या बायका आणि लहान मुलींना काय प्रवेशास अडचण. मध्ये पुण्यातील एका रणरागिणी तृप्ती देसाई यांनी बऱ्याच मंदिरांची दारे महिलांसाठी खुली केली. शबरीमाला च्या म्हणजे केरळच्या मंदिराचे मोठे प्रकरण याच विषयांनी गाजले. दुपारी याच डोके जड करणाऱ्या विषय घेऊन घरी आलो. घरी मला आणि भावाला भेटायला गावातील जिल्हा परिषद च्या शाळेतील सर त्यांच्या मुलाला घेऊन आलेले. आपल्या शिक्षकी पेशातील एखादा माणूस भेटला तर मन प्रसन्न होत तस झालं अगदी माझं. त्यांचा मुलगा यूपीएससी परीक्षा नुकताच पास झाला होता. म्हणजे दिल्ली मधील फक्त मुलाखत बाकी होती. इतक्या अभ्यासू मुलाची भेट बीड सारख्या गावात होती ही त्या गावाला लागलेली सुखद पर्वणीच होती. मी त्याचे अभिनंदन केले. सरांनी त्यांची मुलगी एमबीबीएस च्या दुसऱ्या वर्गात आहे सांगितले. मग मला अगदीच राहवेना म्हणून मी तो मंदिरातील स्त्री प्रवेशाचा विषय काढला. सर तुम्ही मनात आणले तर ही परिस्थिती बदलू शकते. सर म्हणाले की आमच्या स्त्रियांनाच या गोष्टीत उत्सुकता नसते आणि आपण कशाला धार्मिक बाबतीत मध्ये पडायचे. सर्व संभाषणात त्यांच्या मुलानेही प्रवेश घेतला. तो म्हणाला शबरी माला प्रवेशात इतका खर्च झाला की ज्यामध्ये ६ महिने शिक्षण खर्च राज्याचा निघाला असता. माझा सुरही काही थांबत नव्हता मी म्हणालो अरे ६ काय एक दोन वर्षांचा अजून जाऊ दे पण पुढे समानता तर येईल. तोही म्हणत होता आपले अडते कुठे पण या मंदिरात प्रवेश महिलांनी नाही केला तर म्हणजे मला काय त्रास होतो. मी अगदीच साफ पणे उत्तर दिले. त्रास मला भरपूर झाला जेंव्हा मी आतमध्ये प्रवेश केला आणि माझ्यामागे आमची म्हातारी आज्जी चपला काढून रखरखत्या उन्हात उभ्या होत्या. मला त्रास झाला जेंव्हा मी पुढे गेल्यावर बघितले ज्या आईने आरतीचे ताट केले ती चपला काढून बाहेर उन्हाच्या झळा खात होती. लहान बहिणी नशीब नव्हत्या नाहीतर त्यांचे पाय पोळले असते ही शंका बाहेर काढली. हे संभाषण वाढत होते त्यावर त्या मंदिरामध्ये जाण्यापेक्षा जर मुलींच्या शिक्षणावर भर दिला तर ते उत्तम होईल असे काहीसे पलीकडून म्हणणे आले. पण शिक्षण घेऊनही पुढे जर बदल स्वीकार होणार नसेल तर काय फायदा या पुरुषसत्ताक मानसिकतेचा, हा प्रश्न खूप समोर होता. मी शेवटचं एक वाक्य बोलून थांबलो शेवटी, ज्या मंदिरात माझ्या जन्मदात्या आईसारख्या स्त्रियांना प्रवेश नाही अशा मंदिरात मी जाणार नाही. मी अशा मंदिरांवर निषेध व्यक्त करतो. आणि माझ्या विद्यार्थ्यांना पण असे समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. हा त्या देवाला मला भेटायची इच्छा झाली तर मी नक्की भेट देईल आणि हो देव सहपत्नी येऊ शकतात हा.
बरं पुढचे माझे तिथले मनाला न पटणारे शोधही थांबे ना. गावाच्या सरपंच महिला, गावाची उपसरपंच महिला, गावाची नायब तहसीलदार जी माझी विद्यार्थिनी आहे तीही महिला, जिल्ह्याची मागील पाच वर्षांची आणि पुढिलही पाच वर्षे होऊ घातलेली खासदार प्रीतम मुंढे त्याही महिलाच, आणि याच जिल्ह्याच्याच पंकजाताई मुंढे यादेखील मंत्री मंडळात बसतात. मग जर बीड च्या महिला अशा भरारी घेऊ शकतात तर त्यांना का प्रवेश नाही मंदिरात.... बर मी काही प्रयत्न करावेत तर मी गावातील नाही आज असेल उद्या नाही. माझा असा प्रश्न देखील अनुत्तरित राहतो. चला म्हणालो लिहिण्यातून व्यक्त व्हा.
(हा लेख मी ८ जून २०१९ ला फेसबुक वर सर्वप्रथम लिहिला होता.)
No comments:
Post a Comment