गृहिणी: या
Profession विषयी.....
नुकताच ३ नोव्हेंबर २०२० रोजी
जागतिक गृहिणी दिन साजरा केला. म्हणून त्या profession विषयी लिहाव म्हणल.
सर्वसाधारणपणे जेंव्हा विद्यार्थी दशेत पालक किंवा अगदी विद्यार्थी देखील शालेय
किंवा महाविद्यालयीन अर्जावर पालकांचा व्यवसाय असे लिहावयाचे असते तिथे वडिलांचा
आहे तो व्यवसाय किंवा नोकरी याबद्दल व्यवस्थित लिहिले जाते. मात्र ज्यांची आई घरी
असते तिच्या समोर 'गृहिणी' असे लिहिले जाते. एखादे वडील जेंव्हा निवृत्ती
घेऊन घरचे काम करतात तेंव्हा मात्र त्याच्यापुढे 'निवृत्त' किंवा
इंग्रजीमध्ये 'Retired' असे लिहिले जाते. भले असा गृहस्थ पुरुष निवृत्त
झाल्यावर आपल्या पत्नीला जेवण करणे, झाडू मारणे, धुणे- भांडी या गोष्टींमध्ये मदत
करत असेल.
गृहिणी हा शब्द मुळात गृह या शब्दापासून तयार होऊन पुढे स्त्रीलिंगी म्हणजे स्त्रियांसाठी बनला आहे. घराला सांभाळणारी, घराला माया देणारी आणि आजकाल बोलवायचे झाले तर त्याला Homemaker असा मस्तपूर्ण शब्द दिला गेला आहे. खर तर आपण जेंव्हापासून घरी राहणाऱ्या आपल्या आईला बघत आहे तेंव्हा ती एक गृहिणी म्हणून आपल्यासमोर ती उभी राहिलेली आहे. घरी राहून कोणत्याही कामाला मग ते साफसफाई करणे असेल, अंथरून पांघरून साफ करणे असेल, धुणे- भांडी करणे असेल, स्वयंपाक करणे असेल, परसबागेतील साफसफाई करणे असेल, मुलांचे आवरणे - त्यांचा अभ्यास घेणे असेल, घरातील लहान मुलांपासून वयस्कर माणसांचे पालनपोषण करणे असेल, देवपूजा करणे, पाहुण्याचे आदरातिथ्य करणे असेल घरतील कमावत्या व्यक्तीकडून पैसे मिळाले की सर्व देणेकरी मग त्यात दुधवाला, पेपरवाला, किरणा यांचे नियोजन करणे, रोजच्या भाज्या - लागेल तसा किराणा आणणे, बर या भाज्या -किराणा आणताना घरातील प्रत्येकाच्या पसंती - नापसंतीचा विचार करणे अशा अनेक गोष्टी गृहिणीला लक्षात घ्याव्या लागतात - कराव्या लागतात.
महाविद्यालयात जेंव्हा व्यवस्थापनाचे धडे शिकतो तेंव्हा त्यामध्ये टाइम मॅनेजमेंट म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन शिकवले गेले त्यानुसार गृहिणी त्यांच्या वेळा पाळणे यामध्ये तरबेज असतात. म्हणजे सकाळी नाश्त्याच्या वेळी नाश्ता झाला पाहिजे, दोन्ही जेवणाच्या वेळी जेवण तयार असते, दुपारी फावल्या वेळात भाज्यांच्या तयारी हे सर्व अगदी वेळेतच असते. त्याचसोबत आम्ही जेंव्हा Service Industry Management म्हणजेच सेवा पुरविणाऱ्या संस्थाचा विचार करतो तेंव्हा त्या त्यांच्या ग्राहकाला अगदी समाधान मिळेल या पद्धतीने कार्यरत असतात. लहान मुलांच्या डब्यात त्याला चपाती तोडता येत नाही म्हणून तुकडे करून देणे, मिरच्या तोंडात गेल्या की तिखट लागेल म्हणून भाज्यांमधून मिरच्या काढून देणे, वयस्कर माणसांच्या गोळ्या नाश्त्याच्या आधी - नंतर याची तजबीज करणे, त्यांच्या आहारात जर डॉक्टरांनी काही बदल सांगितले असतील तर त्यानुसार भोजनाच्या सोई करणे. आणि त्याही या सर्व व्यक्तींच्या जागेवर देणे ही एक प्रकारची सेवा पुरवली जाते. 'मामाची बायको सुगरण - रोज रोज पोळी शिकरण' हे जे बालकाव्य आहे ते नेहमीच कुठेतरी Marketing Management म्हणजेच विपणन व्यवस्थापनाचा आभास करून देतात. कारण दिवाळी असो किंवा अन्य धर्माचे कोणतेही सण असो फराळाची जी रेलचेल होते त्यावेळी अमुक - तमुक काकू - मामी - मावशी च्या हाताला चव आहे बर का आणि म्हणून ती काकू - मामी - मावशी तो पदार्थ अगदी व्यवस्थित पणे त्या त्या व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असते. घरावर आर्थिक संकट आल्यास हीच कलाकुसर या गृहिणींना लोणचे - पापड किंवा असे गुह-उद्योग करून पैसा मिळवून देण्यास मदत करतात. तेंव्हा या महिला Business Entrprenership चे देखील काम सांभाळतात. मात्र अशा वेळेस या महिलांना आपण गृहिणी म्हणणे सोडून 'व्यावसायिका' हा शब्द वापरल्यास योग्य ठरेल असे माझे मत आहे. महिन्याच्या शेवटी थोडे पैसे कमी झाले किंवा घरावर आर्थिक संकट कोसळले तरीही घरातील व्यक्तींच्या रोजच्या जीवनावर कोणताही परिणाम घडू नये यासाठी घरातील Finance management म्हणजेच वित्त व्यवस्थापन देखील गृहिणीकडूनच होत असते. घरातील लहान मुलांना शाळेतील अभ्यास सोप्या भाषेत शिकवणे त्याचे Training अगदी त्यांच्या कलेकलेने देणे आणि त्यांना पुढील आवाहनाला सक्षम बनविणे, घरातील प्रत्येकाला त्यांच्या रोजच्या कामात मदत करून त्यांना कामाची दिशा दाखवून मानवी संसाधन व्यवस्थापन म्हणजेच Human Resource Management देखील व्यवस्थित पणे सांभाळण्याचे काम गृहिणी करीत असते. याठिकाणी 'तुझ्या आईने काही शिकवले की नाही' हे वाक्य ऐकायला लागू नये म्हणून अगदीच गृहकृत्यदक्ष पणे गृहिणी सर्व कामे चोखपणे सांभाळत असते. एकंदरीत ऑल राउंडर परिपूर्ण - स्वयंपूर्ण अशी ही गृहिणी कोणत्याही कामाला कोणताही संकोच न बाळगता स्वीकारून पूर्णत्वाच्या दिशेने नेत असते.
आता आपण थोडे स्त्रियांच्या दुसऱ्या
profession व्यवसायांचा जर विचार केला म्हणजे गृहिणी सोडून इतर तर महिला आज बऱ्याच
क्षेत्रात अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात आणि
त्याबदल्यात त्याचा मोबदला म्हणून त्यांना त्या संस्थेकडून वेतन दिले जाते. शेतकरी
स्त्रीला देखील तिचे देय वेतन मिळते. मात्र अजूनही शेतात भरपूर राबून शेतकरी
स्त्री असते, अशी संकल्पना रुजायला वेळ लागतो आहे. व्यावसायिक म्हणजेच एखादी
डॉक्टर, वकील, भाजीवाली स्त्री स्वतःचे पैसे आपल्या व्यवसायानुसार कमवून त्याचा
उपभोग घेते. इतकेच काय घरात कामाला ठेवलेली कामवाली स्त्री ही देखील कामाला
अनुसरून रक्कम ठरवते आणि तसा मोबदला ती मालकांकडे मागते. मात्र तीच सर्व कामे जर
घरातील गृहिणी करीत असेल तर तिला कोणत्याही प्रकारचे वेतन नसते. मोलकरीण
संघटनेच्या दृष्टीकोनातून घरी काम करणाऱ्या स्त्रियांना सुट्ट्या दिल्या पाहिजेत,
त्यांना सणासुदीच्या दिवशी पगारामध्ये बोनस सारख्या सुविधा दिल्या पाहिजेत असे
प्रयोजन पुढे येताना दिसते. तसेच या स्त्रियांच्या कामाची वेळ देखील ठरविक निश्चित
केली जाते. मात्र तुलनेने हेच सर्व गृहिणीच्या बाबतीत बघितले तर तिला कोणत्याही
प्रकारचे देय मिळत नाही. आणि घरातील कामाला येणाऱ्या स्त्रीच्या तुलनेने जास्त काम
करावे लागते तेही कोणत्याही सुट्टीशिवाय. म्हणजेच या profession ला कोणत्याही
प्रकारची security अशी नाही बाहेर काम करणाऱ्या स्त्री पुरुषांना पात्र आस्थापनेकडून
पीएफ, मेडिकल फंड अशा अनेक सुविधा दिल्या जातात मात्र घरातील काम करणाऱ्या
गृहिणींना या कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत.
चित्रपटाद्वारे अथवा सिरीअल्यमधून
अशा प्रकारच्या गृहिणी स्त्रियांचे उदात्तीकरण केले जाते. त्या किती महान आहेत हे
दाखविले जाते. घरी राहणाऱ्या स्त्रिया अगदी सुंदर-सुंदर कपडे घालून किंवा भरपूर
दागिने घालून किचनमध्ये स्वयंपाक करताना दाखविल्या जातात. सुप्रसिद्ध इंग्लिश
विन्ग्लीश या श्रीदेवीच्या गाजलेल्या चित्रपटातून घरातील स्त्री ही कसे
बाहेरील जगमाध्येच नाही तर घरातील पती आणि मुलांकडून देखील नाकारली जाते आणि
त्यासाठी तिची धडपड हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तर कहाणी घर घर की, क्योकी
सासं भी कभी बहू थी, सास निभाना साथिया अशा एकता कपूरच्या सिरिअल्स मधून देखील
स्त्रियांनी कसे घर सांभाळले पाहिजे या गोष्टींचे प्रकटीकरण केले आहे. अनुपमा
नावाच्या एका सीरिअलमधून घरतील एका स्त्रीने कसे संपूर्ण कुटुंब सांभाळून घरातील
प्रत्येक गोष्टींबद्दल निष्टावंत राहायचे असते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रकटीकरणाकडे न पाहता स्त्रियांच्या गृहिणीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जरीही एका स्त्रीला गृहिणी बनण्यात उत्सुकता असेल तरीही त्याकडे व्यवस्थापन, किंवा श्रमाचे प्रतिफळ या दृष्टीकोनातून सर्वांनी पहिले तर योग्य राहील. स्त्रियांच्या शिक्षणाला अनुसरून गृहिणी ही संकल्पना ही फक्त व्यापक बनली आहे. तसेच ती फक्त स्त्री पुरती मर्यादित न राहून पुरुषांकडे देखील आली आहे मात्र 'गृहस्थ' असा शब्द पुरेसा वापरला जात नाही किंवा त्याला घरी बसलेल्या पुरुषांकडून स्वीकारला जात नाहीये, असे म्हणावयास हरकत नाही. तो चांगल्या पुरुषांसाठी 'सद्गगृहस्थ' असा वापरला जातोय.
सर्व गृहिणींना त्यांच्या कार्यासाठी सलाम
पवार अलोक अर्जुन अलका
एम.एस्सी. संगणक शास्त्र, एम.बी.ए.,
एम.एस्सी. संप्रेषण - भौतिक शास्त्र, एम.फील.
खूपच सुंदर मांडणी.
ReplyDeleteकांचन मॅडमची शिकवण आहे मला
Delete