आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन : ग्रामीण महिलांचा सन्मानाचा दिवस
प्राचार्य
अलोक पवार
१५ ऑक्टोबर २०२०
आज १५ ऑक्टोबर २०२० रोजी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन आहे त्या निमित्ताने......
![]() |
शहरातील स्त्रिया उच्च पदस्थ ठिकाणी काम करतात, काम कोणतेही असो त्या कामामधून त्यांच्याकडे पैशाचे साधन निर्माण होते. या पैशातून त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजामध्ये त्यांची एक प्रतिमा निर्माण करीत असतात. शहरी भागात या महिल्या खूप शिकल्या, त्यांनी कुठे नोकरी केली, एखाद्या व्यवसाय सुरु केला की त्याची त्या कामानुसार मान - सन्मानदिला जातो. मात्र खेडेगावात ज्या महिला आपल्या नवऱ्यासोबत शेतात राब - राब - राबून मेहनत करून शेत फुलवितात त्यांची साधी दखलही घेतली जात नाही.
जो स्त्रीवाद मी अभ्यासलेला आहे त्यानुसार 'स्त्रिया' आणि 'शेताच' जवळच नात त्यात दर्शिविले गेले आहे. शेतामध्ये जी स्त्रियांनी करण्याची कामे आणि पुरुषांनी करण्याची कामे विभागली गेली आहेत ही सर्व कामे स्त्री - पुरुषांच्या आचरणानुसार वर्गीली गेली आहेत. ग्रामीण भागामध्ये पुरुष नांगरणी आणि पेरणी अशी कामे करतात. मात्र स्त्रिया बीज संवर्धनापासून लावणी केल्यानंतर खुरपणी, मळणी, कापणी धान्य उंचावरून पाडणे, साफसफाई करणे, चालणे, भरडणे, साठवणूक करणे या सर्व कामांची जवाबदारी स्त्रियांकडे येते. पिक जोमाने आले त्यापुढील व्यवहाराचे काम मात्र पुरुषांकडेच असते. त्याला बाजारात नेणे आणि त्याचा मोबदला मिळवणे ही जवाबदारी पुरुषवर्ग सांभाळत असतो. इतके असूनही त्या ग्रामीण स्त्रिया शेतकरी आहेत की नाही हा एक ज्वलंत प्रश्न पुढे येतो. त्यांचे ७/१२ वर नाव लागणे सुरु जरी झाले तरी त्यांना तो हक्क मिळतो का, याबाबत शंका आहे.
ग्रामीण भागातील स्त्रियांची कामे फक्त शेतातल्या याच कामांवर थांबत नाही. कोंबड्या, शेळ्या सांभाळणे, गाई म्हशींची धार काढणे, त्यांना खाण्यासाठी चारा गोळा करून ठेवणे. त्यांना पाण्याची सोय करणे. मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागात जिथे पाण्याचे वांदे आहेत तिथे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची देखील सोय लांबून विहिरीवरून किंवा हापश्यावरून सोय ही या ग्रामीण स्त्रियांना करावी लागते. याशिवाय आवारात परसबाग तयार करणे त्याची मशागत करणे. गावच्या आठवडी बाजारात आपला भाजीपाला विकला जाईल यासाठी प्रयत्न करणे, तो अखंड भार घरापासून बाजारात आणि उरलेला माल पुन्हा बाजारापासून घरापर्यंत वाहण्याची कामे या ग्रामीण स्त्री कडे असते. काही ठिकाणी स्त्रिया या व्यक्तिरिक्त टोपल्या विणणे किंवा गृहउपयोगी कामे देखील स्त्रिया करीत असतात. गावाकडील मुलींना शिक्षण तसे मोजकेच दिले जाते, नुसते लिहायला वाचायला जमले आणि सरकारी नियमानुसार तिचे वय १८ झाले की तिचे लग्न लावून दिले जाते. ती मुलगी देखील पुढे मला शेतातील कामे किंवा गृहिणी बनून राहायचे आहे त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्षच करते. त्यामुळे शिक्षणाचे महत्व देखील कमी असते. त्यामुळे जरीही एखादी स्त्री जी शेतात कामे करीत असेल तरीही ती स्वत: शेतकरी आहे हे तिला उमगत नाही. गावातील एखाद्या विद्यार्थ्याला वडील पालक म्हणून 'शेतकरी' लिहायचे कळते तसे आई पालक म्हणून 'गृहिणी' लिहिणेच तो पसंत करतो.आता थोडे या ग्रामीण भागातील स्त्रियांच्या गृहिणीपणाकडे देखील थोडे पाहू. मलाच एका ग्रामीण भागात जाण्याच्या प्रसंग आला होता. गावातील सर्वांचे जेवण तसे पोषक, मजबूत अशा प्रकारचे असते. सकाळीच भाजी - भाकरी असे जेवण असते. शहरातल्या लोकांसारखा नाश्ता असे प्रकरण गावात पाहणे जरा अवघडच. पण उगाच गावाच्या बाजारात दिसते म्हणून आप्पे पात्र आणि इडली पात्र मी स्वत: एका गावातील नातेवाईकांकडे घेऊन गेलो. घरातले काम आटोपून पटकन या ग्रामीण महिलांना थेट शेतात जायचे असते. मग दुपारच्या जेवणासाठी भाकऱ्या थापणे - भाजणे, भाजी परतणे, वरण भात करणे हे देखील काम याच वेळेत करणे महत्वाचे असते. त्याच वेळेत गाई म्हशींनी शेण टाकले असेल तर त्याची विल्हेवाट लावणे, रोजचे आंगण साफ करणे, त्याला सारवणे, दुध काढणे ही कामे वेळेत करणे देखील महत्वाचे असते. मग या वेळेत त्या इडली आप्पे यांचे बाळंतपण करणे म्हणजे जरा वेळखाऊपणाचे काम ना. आणि शेतकरी म्हणजेच कष्टकरी शरीराला या आप्पे - इडली मधून काय पोषणपाणी मिळणार. ठीक आहे जिभेचे चोचले आपण रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी करू शकतो का? अजिबातच नाही, ग्रामीण भागातील या स्त्रियांना कसली सुट्टी आणि कोणत्या सार्वजनिक सुट्ट्या. शहरी भागातील सर्वांनाच रविवार किंवा सार्वजनिक सुट्ट्या अशा सुट्ट्या असतात मात्र ग्रामीण स्त्री तिच्या कामात अगदी व्यग्र असते.
ग्रामीण भागातील हीच स्त्री स्त्रियांच्या वाटेची नेहमीची कामे जसे की कपडे धुणे - भांडी घासणे ही कर्तव्य बजावणारी कामे नेहमी करीतच असते. त्याठिकाणी शहरी स्त्रियांसारखी घरगडी किंवा मोलकरीण ठेवून ही कामे करणे हे देखील शक्य नसते. कारण या सर्व कामांना ग्रामीण स्त्रिया आपली कर्तबगिरी समजत असतात. याशिवाय घरातील लहान मुलांची जोपासना करणे, त्यांना अंघोळी घालणे, त्यांचे आवरणे त्यांना शाळेत पाठवणे अशी कामे देखील या ग्रामीण स्त्रिया करीत असतात.
मा. शरद पवार यांच्यामुळे समजातील ५०% स्त्रिया राजकारणात आल्या. ग्रामीण भागातील स्त्रियांना देखील राजकारणात सहभागी झाल्या. मात्र त्यांच्या हा सहभाग कसा आहे हे पाहणे महत्वाचे आहे. ग्रामीण भागातील महिलांना सरपंच पद भेटते. मात्र हे पद नावालाच असते असे म्हणावयास हरकत नाही. कारण की हा सर्व कारभार त्या स्त्रीचा पती किंवा मुलगाच सांभाळत असतो. आणि ती नामधारी महिला अजूनही शेतात राबते - ती तितकेच काम करते जितके अन्य ग्रामीण स्त्रिया कामे करतात.
गावात उपजीविका आणि पाहिजे तशी साधने न भेटल्यामुळे गावातून शहराकडे स्थलांतर होणारी जर लोकसंख्या पाहिली तर त्यामध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त असताना दिसते. मग योग्य शिक्षण आणि नोकरी ही शहरी ठिकाणी भेटते हा यामागचा उद्देश. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे स्थलांतर हे नवऱ्याची किंवा मुलांची गृहस्थी सांभाळणे आणि त्यासाठी शहराकडे धाव घेणे यासाठी असते. त्यामुळे जिथे ग्रामीण स्त्रियांच्या शिक्षणाचा किंवा व्यवसाय - नोकरी करून स्वत:ची उन्नती करण्याचा विचार, विकासीत होण्याचा विचार कुठेतरी मागे पडतो असे वाटते.
गावातील मुलींना लहानपणीच बऱ्याच गोष्टी अंगावर टाकल्या जातात. आणि त्यामुळेच त्यांची गृहिणीकरणाची प्रक्रिया आणि त्याबाबत विचार सुरु होत असतात. गावामध्ये मुलींना आईसोबत पाणी आणणे, अंगण साफ करणे अशी कामे असतात. त्याचसोबत स्वत: लहान असल्या तरीही आपल्या लहान भावंडांना सांभाळण्याची जवाबदारी त्यांच्या नाजूक खांद्यावर येऊन पडते. लहानपणापासून ही ग्रामीण कामे आपल्याला करावी लागतात या उद्देशात ही लहान मुलगी देखील त्या कामांना आपलेसे करीत असते.
आपण सर्वांनी मिळून ग्रामीण महिला या देखील एका सर्वोच्च मान सन्मानाच्या हक्कदार आहेत, या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे पहिले पाहिजे. त्यांचा सन्मान करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. गावातील किंवा गावांशी संबंधातील सर्वांनी या स्त्रियांच्या त्यांच्या कामाचा सन्मान केला पाहिजे.
चला आज या आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनी या महिलांचा सन्मान करूयात.
प्रा. अलोक अर्जुन अलका पवार
एम.एस्सी. संगणक शास्त्र, एम.बी.ए., एम.एस्सी. संप्रेषण - भौतिकशास्त्र, एम.फील.
स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्यूटर स्टडीज, धनकवडी, पुणे - ४३



Nice sir
ReplyDeleteVery nice article congratulations
ReplyDeleteNice sir
ReplyDeletePics. Mast aani tumche vichar khuupch sundar
ReplyDeleteMay I know who are you
Deleteमाहितीपूर्ण असा लेख सर!! विचार मांडणी खूपच सुंदर..
ReplyDelete